आंदोलनापूर्वीच दखल घेत स्मशानभूमीतील शेडचे काम पूर्ण

आनंद गायकवाड
Wednesday, 23 September 2020

संगमनेर शहराच्या दक्षिणेकडील प्रवरा नदीच्या काठी असलेल्या स्मशानभुमीची मोठी दुरावस्था झाली होती. या प्रश्नाची निकड व गांभीर्य समजून नगरपरिषदेने तातडीने दहनाच्या उघड्या ओट्यावर पत्र्याच्या शेडचे काम पूर्ण केले. 

संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर शहरातील अमरधामच्या अनेक दिवसांपासून रेंगाळलेल्या कामासाठी स्मशानभुमीतील उघड्या ओट्यांवर झोपून अनोखे शव आंदोलन करण्याची तयारी भारतीय जनता पक्ष व संगमनेर पुरोहित संघाने केली होती. मात्र आंदोलनाची वेळ येवू न देता संगमनेर नगरपरिषदेने तातडीने हे काम पूर्ण केल्याने, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

संगमनेर शहराच्या दक्षिणेकडील प्रवरा नदीच्या काठी असलेल्या स्मशानभुमीची मोठी दुरावस्था झाली होती. शहरातील संवेदनशील नागरिक व भारतीय जनता पक्ष तसेच संगमनेर पुरोहित संघाने यासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांच्याकडे या कामी लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे सुरु झालेले दुरुस्ती व नुतनीकरणाचे काम सात-आठ महिन्यांपासून रेंगाळले होते. दरम्यानच्या काळात कोविड विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शहरातील काही नागरिक मृत्यूमुखी पडले.

या काळात सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे अंत्यविधी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे कामही रेंगाळल्याने हे काम त्वरीत पूर्ण करुन जनतेसाठी खुले करण्याची मागणी केली होती. याकडे लक्ष वेधण्यासाठी भर पावसात उघड्या ओट्यावर झोपून शव आंदोलनाचा पर्यायही भाजपाच्या सभेत पुढे आला होता. मात्र या आंदोलनाची वेळ आली नाही. या प्रश्नाची निकड व गांभीर्य समजून नगरपरिषदेने तातडीने दहनाच्या उघड्या ओट्यावर पत्र्याच्या शेडचे काम पूर्ण केले. 

यासाठी भारतीय जनता पक्षाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या सभेला माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे, शिरीष मुळे, अँड. श्रीराम गणपुले, राधावल्लभ कासट, जावेद जहागीरदार, राजेश चौधरी, राहुल भोईर, सुदाम ओझा, सीताराम मोहरीकर, गिरीश सोमाणी आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन : सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The work of the shed in the Sangamner city cemetery has been completed