
वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजने अंतर्गतची कर्मचाऱ्यांची सर्व थकीत बिले एक रकमी अदा करण्यात यावीत, सानुग्रह अनुदानाची उर्वरित दोन हजार रुपयांची रक्कम तातडीने मिळावी आदी 17 प्रलंबित मागण्यांसाठी महापालिका कामगार संघटनेने आज सकाळपासूनच काम बंद आंदोलन सुरू केले.
नगर ः महापालिका कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सुटत नसल्याने नगर महापालिका कामगार संघटनेने आज काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे महापालिकेतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा ठप्प झाल्या आहेत. महापालिकेतील अधिकाऱ्यांबरोबर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची दोन वेळा बैठक झाली. मात्र, त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे उद्या (शुक्रवारी) महापालिकेचे कामकाज बंद राहण्याची शक्यता आहे.
नगर महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाचा फरक एक रकमी अदा करण्यात यावा, महापालिका कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीतील 12 कोटींची बेकायदेशीरपणे खर्च केलेली रक्कम तातडीने या निधीमध्ये एक रकमी वर्ग करण्यात यावी, सर्व पात्र कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नतीचा फरक एक रकमी अदा करण्यात यावा.
वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजने अंतर्गतची कर्मचाऱ्यांची सर्व थकीत बिले एक रकमी अदा करण्यात यावीत, सानुग्रह अनुदानाची उर्वरित दोन हजार रुपयांची रक्कम तातडीने मिळावी आदी 17 प्रलंबित मागण्यांसाठी महापालिका कामगार संघटनेने आज सकाळपासूनच काम बंद आंदोलन सुरू केले.
संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे व सरचिटणीस आनंदराव वायकर यांनी महापालिकेच्या प्रमुख प्रशासकीय इमारतीत उपस्थित कर्मचाऱ्यांना घेऊन आयुक्तांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला. कर्मचाऱ्यांच्या घोषणांनी महापालिका परिसर दानानून गेला.
आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी अनंत लोखंडे व वायकर यांच्याशी संपर्क करून आंदोलन मागे घेण्यास सांगितले. मात्र नेते व आंदोलक ठाम होते. आयुक्तांबरोबर संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या दिवसभरात दोन बैठका झाल्या. मात्र, या बैठका निष्फळ ठरल्या. या काम बंद आंदोलनामुळे महापालिकेत कामासाठी आलेल्या नागरिकांना निराश होऊन परत जावे लागले.
आजदिवसभरात आंदोलनाबाबत दोन बैठका झाल्या. मात्र, प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने हे आंदोलन सुरू ठेवावे लागले. उद्याही ते कायम राहील.
- अनंत लोखंडे, अध्यक्ष, महानगरपालिका कामगार युनियन.
संपादन - अशोक निंबाळकर