नगरकरांनी बेशिस्तीपाई भरला सव्वादोन कोटींचा भुर्दंड

सूर्यकांत वरकड
Thursday, 31 December 2020

नगरकरांना शिस्त लावण्यासाठी शहर वाहतूक शाखेचे पोलिस कारवाई बडगा उगारतात. जानेवारी ते नोव्हेंबर-2020 दरम्यान वाहतूक पोलिसांनी शहरातील विविध भागांत रस्त्यावर थांबून वाहतूक नियम मोडणाऱ्या सुमारे एक लाख वाहन चालकांवर कारवाई केली.

नगर : शहरात वाहतुकीची कायमच बोंबाबोंब. वाहतूक नियमांचे पालन न करता, दुचाकीस्वार शहरात निर्धास्त फिरतात. अशा बिनधास्त वाहनचालकांना वाहतूक पोलिस वठणीवर आणतात.

गेल्या 11 महिन्यांत वाहतूक पोलिसांनी सुमारे 94 हजार 500 चालकांवर कारवाई करून 2 कोटी 28 लाख 29 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला. ई-चलन प्रणालीमुळे दंड आकारणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. 

नगरकरांना शिस्त लावण्यासाठी शहर वाहतूक शाखेचे पोलिस कारवाई बडगा उगारतात. जानेवारी ते नोव्हेंबर-2020 दरम्यान वाहतूक पोलिसांनी शहरातील विविध भागांत रस्त्यावर थांबून वाहतूक नियम मोडणाऱ्या सुमारे एक लाख वाहन चालकांवर कारवाई केली.

हेल्मेट नसणे, सिग्नल न पाळणे, वाहनपरवाना नसणे, दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास, प्रवासी वाहनात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविणे, ड्रंक अँड ड्राईव्ह आदींचा समावेश आहे. 

जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये पोलिसांनी चांगली कामगिरी करीत दंड वसूल केला. मात्र, मार्च ते नोव्हेंबरदरम्यान कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन झाले. रस्त्यावरील गर्दी कमी झाली. परिणामी, कारवाई थांबली. मात्र, नोव्हेंबरनंतर पुन्हा एकदा बाजार गजबजला नि पुन्हा पोलिस कारवाईला सुरवात झाली. 

वर्षनिहाय आकडेवारी 
वर्ष   कारवाई    दंड 

2017  25,588  52,64,200 
2018  33,283  89,12,700 
2019  65,065  1,52,07,500 
2020  94,409  2,28,29,700 
.
ई-चलन प्रणाली पावली 
शहर वाहतूक पोलिसांना पूर्वी वाहनचालकांना थांबवून नाव-गाव विचारून दंड करावा लागत होता. आता ई-चलन प्रणालीमुळे पोलिस कर्मचाऱ्यांचे काम सोपे झाले. परिणामी, मोठ्या प्रमाणात कारवाई होऊ लागली. केवळ वाहनाचा फोटो काढून अपलोड केल्यानंतर वाहनचालकाला ऑनलाइन दंड भरावा लागतो. त्यामुळे गेल्या चार वर्षांच्या तुलनेत यंदा वाहतूक शाखेला ई-चलन प्रणाली चांगलीच पावली. 
 

ई-चलन प्रणालीमुळे दंड वसूल करणे सोपे झाले. त्यात वाहनांची संख्याही वाढली. दोन-तीन कारवाया होऊनही दंड न भरल्यास, एकाच वेळी सर्व दंड भरावा लागतो. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. 
- विकास देवरे, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the year in Ahmednagar Action on one lakh vehicles