पर्यटन क्षेत्रात तुम्ही यशस्वी होऊ शकता; कोरोनाचा मोठा परिणाम असला तरी यात करिअरला संधी

आनंद गायकवाड
Tuesday, 20 October 2020

आपला कम्फर्ट झोन सोडून बाहेर पडून प्रवास केला तरच तुम्ही आदरातिथ्य व पर्यटन क्षेत्रात यशस्वी होवू शकता, असे आवाहन शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले.

संगमनेर (अहमदनगर) : आपला कम्फर्ट झोन सोडून बाहेर पडून प्रवास केला तरच तुम्ही आदरातिथ्य व पर्यटन क्षेत्रात यशस्वी होवू शकता, असे आवाहन शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले. संगमनेर महाविद्यालयातील बी. व्होक.(आदरातिथ्य व पर्यटन) विभागाद्वारे नोकरी व व्यवसायाच्या संधी या विषयावर एक दिवशीय ऑनलाईन वेबिनारमध्ये ते बोलत होते.

ते म्हणाले, कोरोना प्रादुर्भावाचा पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला असला तरी, ही परिस्थिती कायम राहणार नसून, येत्या काळात पर्यटन क्षेत्र पुन्हा भरारी घेणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चिंतीत न होता भविष्यातल्या गरजा ओळखुन तयारीला लागावे. दुबईच्या ग्लोबल डेस्टीनेशन हेल्थचे उपाध्यक्ष डॉ. अनिल बनकर यांनी पर्यटन क्षेत्रातील विविध पैलु व नोकरीच्या विविध संधी तसेच वैद्यकिय पर्यटन या नवीन क्षेत्राबद्दल सविस्तर माहीती दिली.

मालदिवच्या हॉटेल अमारी हवादाचे मार्केटींग हेड किरण सोनवणे यांनी हॉस्पिटॅलिटी क्षेत्राच्या कमर्शियल विभागामधील विविध संधी तसेच परदेशात उपलब्ध असलेल्या व्यावसायिक प्रशिक्षणासाठी उपलब्ध संधीची माहीती दिली. तिरुपती येथील इंडियन कलिनरी इंन्स्टीट्युटचे डॉ. डी. एम. लोमटे यांनी शासकीय व निमशासकीय कार्यालयातील संधी व क्रुझ लाईन क्षेत्रातील करियरबाबत मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी महाविद्यालयातील बी. व्होक आदरातिथ्य व पर्यटन विभागद्वारे सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय व आर्थिक मुल्ये वृध्दींगत करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.

या उपक्रमात महाविद्यालयातील बी.व्होक. (आदरातिथ्य व पर्यटन) विभागातील प्राध्यापक व 138 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रास्ताविक प्रा. रविंद्र गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रश्मी सिंग यांनी केले तर आभार प्रा. प्रसाद वाकचौरे यांनी मानले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: You can be successful in tourism