Video : विधवा भावजयीसोबत लहान दीराची थाटामाटात लग्नगाठ, वऱ्हाडी-गावानेही वाजविल्या टाळ्या!

विनायक दरंदले
Thursday, 7 January 2021

वडाळा बहिरोबा येथे हिंदू धर्मातील रुढी, परंपरेला छेद देण्याचे काम झाले. वऱ्डाडी आणि गावानेही या लग्नाचे खुल्या दिलाने स्वागत केलं.

सोनई (जि.अहमदनगर) ः भाऊबंद, गावकरी व समाज काय म्हणेल याचा विचार न करता वडाळा बहिरोबा (ता.नेवासे) येथे आज विधवा भावजयीबरोबर लहान दिराने लग्नगाठ बांधली. वऱ्हाडी मंडळींनीही मोठ्या दिल्याने या अनोख्या विवाह सोहळ्याचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले आणि नवदांपत्यास शुभशीर्वाद दिले.

वडाळा बहिरोबा येथे हिंदू धर्मातील रुढी, परंपरेला छेद देण्याचे काम झाले. विधवा सुनेच्या आयुष्यात दाटलेल्या अंधाराला पुनर्विवाहाच्या निमित्ताने सास-यांनी प्रकाशाची वाट निर्माण करून दिली.

हेही वाचा - मंत्र्यांच्या बहिणीने अमेरिकेतून शिक्षिकेला दिले धडे

सर्वसाधारपणे जे लोक किंवा कुटुंब रूढी-परंपरेच्या बाहेर जाऊन निर्णय घेतात त्यांना वाळीत टाकलं जातं. किंवा नाकं तरी मुरडली जातात. परंतु या दीर-भावजयीच्या लग्नगाठीचे समाजाने मोठ्या दिलाने स्वागत केलं. या विवाह सोहळ्यात उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. सामाजिक कार्यकर्ते चांगदेव मोटे यांच्या कामाला लोकांनी दाद दिली.

संजय मोटे यांचा अभियंता असलेला थोरला मुलगा महेशचे दोन वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले. त्याच्यामागे पत्नी प्रांजली सात महिन्यांच्या बाळासह पोरकी झाली. प्राजंलीचे वडील बाळासाहेब गव्हाणे (राहुरी फॅक्टरी) निःशब्द झाले होते. आता मुलीचं कसं होणार या चिंतेत ते होते. सासरे संजय मोटे यांनीच यातून मार्ग काढण्याचे ठरवले. त्यांनी विधवा सुनेचा विवाह लहान मुलगा अभियंता महेंद्रबरोबर निश्चित केला. प्रांजली आणि महेंद्र यांचे मत घेतलं. ते राजी झाल्यानंतर त्यांनी पुढील हालचाली केल्या. आज हा अगळावेगळा विवाह संपन्न झाला.
 

मोठ्या भावाला यापेक्षा मोठी श्रद्धांजली असुच शकत नाही, असा प्रस्ताव माझ्याकडे मांडण्यात आला. माझे कुटुंबच माझे स्वप्नं असल्याने मीपणा बाजूला ठेवून विवाहास तयार झालो.
- महेंद्र संजय मोटे,वर

माझ्या लहान मुलाचा व विधवा सुनेचा ठरलेला विवाह मोजक्या लोकांत लपूनछपून एखाद्या मंदिरात केला असता. मात्र, मी समाजापुढे प्रेरणा ठरावी म्हणून मोठ्या थाटात हा विवाह केला आहे. यातून एकाने जरी आदर्श घेतला तरी हे कार्य सफल झाल्याचं समाधान होईल.
- संजय मोटे,वरपिता,वडाळा बहिरोबा, नेवासा.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A young man from Nevasa married his brother's wife