संपूर्ण कुटुंबच क्वारंटाईन केलं... म्हणून गावकऱ्यांनी दाखवली...

शांताराम काळे
Wednesday, 29 July 2020

असे म्हणतात कोरोनामुळे माणुसकी हरवली, मात्र आदिवासी ग्रामीण भागात अजूनही ही माणुसकी जिवंत असल्याचे चित्र समोर आले आहे.

अकोले (अहमदनगर) : असे म्हणतात कोरोनामुळे माणुसकी हरवली, मात्र आदिवासी ग्रामीण भागात अजूनही ही माणुसकी जिवंत असल्याचे चित्र समोर आले आहे. आदिवासी समाज हा डोंगर दर्यात राहणारा समाज व भात शेती त्यांची प्रमुख कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव पीक अशातचं पेंडशेत (ता. अकोले) गावात कोरोनाचा शिरकाव झाला. संपुर्ण कुटुंब क्वारंनटाइन झाले.

वर्षभराचे एकमेव भात पीक लागवडीचा कालावधी मग त्यांची आवणी (भात लागवड) करणार कोण? अशावेळी गावातील तरुणांनी निर्धार केला व मदतीचा हात देत त्या कुटुंबाची भात लागवड करुन शेती सुजलाम सुफलाम् करून देऊन समाजापुढे आदर्श निर्माण केला.

गावातील तरुण म्हटले की टवाळ व त्यांच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन वेगळा. मात्र याला पेंडशेत गावातील तरुण अपवाद ठरले आहेत. कोरोना महामारीच्या काळात क्वारंटाईन असणाऱ्या कुटुंबाच्या मदतीला धावून आले. महाराष्ट्रातील सर्वात उंच असणाऱ्या कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या पेंडशेत भागात कोरोनाचा शिरकाव झाला. म्हणून प्रशासनाने संपुर्ण कुटुंब क्वारंटाईन केले.

आदिवासी शेतकरी बांधवाच्या वर्षातील कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव भात पीक व पावसाळ्यात भात लगवडीचा कालावधी संपुर्ण कुटुंब क्वारंटाइन मग त्या कुटुंबाच्या शेतीची लागवड करणार कोण? अशावेळी गावातील अक्षय पदमेरे, केशव वळे, सुनिल पदमेरे, विठ्ठल पदमेरे, गोपाळ पदमेरे, संतोष पदमेरे, लक्ष्मण पदमेरे, भरत पदमेरे, सखाराम मुंढे, सुनील बांडे, निवृत्ती धादवड, मधुकर धादवड, विठ्ठल मुठे, नामदेव वळे या तरुणांनी एकत्र येऊन संबंधित कुटुंबाला मदत करण्याचा निर्धार केला. त्यांनी विनामोबदला भात लागवड (आवणी) करुन दिली.

कुटुंबाच्या वर्षभराच्या उदरनिर्वाहाचे एकमेव पीक असणाऱ्या शेतीला जीवनदान देत शेती सुजलाम सुफलाम् करून देत समाजापुढे एक आदर्श निर्माण करुन दिला. कोरोना महामारीच्या काळात या संकटात नडगमगता मदतीला धावून आले. आपल्या आदिवासी संस्कृती दर्शन घडविले. 

लक्ष्मण पदमेरे- गावात मुंबई येथून आलेल्या चाकरमानी व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या कुटुंबाला आरोग्य विभागाने संस्थात्मक क्वारंटाईन केले. त्यावेळी त्यांच्या शेतात भात अवणीचे काम सुरू होणार होते. अशावेळी हाता तोंडाशी आलेला घास जाणार त्यामुळे हे कुटुंब दु:खीत होते. त्यांची ही अवस्था पाहून आम्ही गावातील तरुण एकत्र येऊन या कुटुंबावर संकट म्हणजे संपूर्ण गावावर संकट समजून आम्ही त्यांची भाताची चिखल तुडवणी व आवणी करून दिली त्यातून आम्हाला वेगळे संधान मिळाले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youngsters from Pendshet in Akole taluka paddy farming