कामात समन्वयाचा अभाव; मनपा पदाधिकारी व नगरसेवकांना सोबत घेवून सर्व्हे 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

महानगरपालिका क्षेत्रात कंटेन्मेंट झोनमध्ये मनपाचे 233 तर कंटेन्मेंट झोनबाहेर जिल्हा प्रशासनातर्फे नियुक्त 426 पथकांद्वारे नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे. आरोग्य तपासणी करणाऱ्या पथकांमध्ये समन्वय नसल्याने मनपा पदाधिकारी व नगरसेवकांना सोबत घेवून सर्वेक्षणाचे काम करण्यात येणार आहे.

अकोला : महानगरपालिका क्षेत्रात कंटेन्मेंट झोनमध्ये मनपाचे 233 तर कंटेन्मेंट झोनबाहेर जिल्हा प्रशासनातर्फे नियुक्त 426 पथकांद्वारे नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे. आरोग्य तपासणी करणाऱ्या पथकांमध्ये समन्वय नसल्याने मनपा पदाधिकारी व नगरसेवकांना सोबत घेवून सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याची सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी केली.

 

अकोला शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बुधवारी सायंकाळी आमदार रणधीर सावरकर यांच्या उपस्थितीत मनपाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्‍ये महापौर अर्चना जयंत मसने, माजी महापौर विजय अग्रवाल, उपविभागीय अधिकारी डॉ.नीलेश अपार, मनपा उपायुक्‍त वैभव आवारे, तहसीलदार विजय लोखंडे, नायब तहसीलदार विजय खेळकर, सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक जयंत मसने, नगरसेवक डॉ.विनोद बोर्डे, धनंजय धबाले आदींची उपस्थिती होती. याबैठकीमध्‍ये मनपाच्या 233 तर जिल्हा प्रशासनाच्या 426 पथकांद्वारे करण्यात येत असलेल्या आरोग्य तपासणीबाबतचा आढावा घेण्यात आला. या पथकांमध्ये एक आशा वर्कर व एक शिक्षक किंवा कर वसुली लिपीक यांचा समावेश आहे. या पथकांद्वारे आरोग्य तपासणीचा पहिला टप्‍पा पूर्ण करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्‍प्‍यात अधिक प्रभावीपणे सर्वेक्षण करण्‍यासाठी आमदार सावरकर यांनी सूचना दिल्यात.

 

दुसऱ्या टप्प्यासाठी संयुक्त आराखडा
या कामामध्‍ये मनपा व जिल्हा प्रशासनात समन्‍वयाचा अभाव राहू नये म्हणून संयुक्‍तरित्‍या आराखडा तयार करून त्‍याआधारे सर्वेक्षणाचे काम जास्‍त प्रभावीपणे व कमीत-कमी दिवसामध्‍ये पूर्ण करण्‍याच्‍या सूचना आमदारांनी दिल्यात. सर्वेक्षणाचा अहवाल दररोज मनपाचे डॉ. फारूख शेख यांच्‍याकडे पाठविण्‍याची सूचनाही देण्यात आली.

जुन्या आजारांच्या रुग्णांची दररोज आरोग्य तपासणी
महानगरपालिका हद्दीत ज्‍या नागरिकांना डायबीटीज, उच्‍च रक्‍तदाब व सर्दी, ताप, खोकला या सारख्‍या आजाराची लागण आहे, अशा नागरिकांचे दररोज निरीक्षण करण्‍यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lack of coordination at work; Survey with Akola Corporation office bearers and corporators