अरे हे काय, पूर्ण उन्हाळा गेला उद्यानात खेळायला मिळाले नाही अन् आता...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 June 2020

उन्हाळा... म्हणजे शाळा नाही... अभ्यास नाही... फक्त खेळायचे, मनसोक्त बाळगायचे... यंदाचा उन्हाळा मात्र चार भिंतीच्या आत गेला...पूर्ण उन्हाळा उद्यानात जायला मिळाले नाही... अन् आता राज्यात इतर ठिकाणी उद्याने सुरू होत असताना अकोल्यातील उद्यानं मात्र बंदच राहणार असल्याने घरात बसून कंटाळा आलेल्या मुलांचा हिरमोड झाला आहे.

अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील शाळा 15 फेब्रुवारीपासून बंद करण्यात आल्यात. तेव्हापासून मुलं घरात कोंडली गेली. कुठे फिरायला जायचे नाही अन् खेळण्यासाठी बाहेर पडण्याची परवानगी नाही. त्यातच अकोला महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने येथे सर्वच सार्वजनिक ठिकाणे बंद असल्याने मुलांना उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद घेता आला नाही. तीन महिन्यानंतर राज्य व केंद्र सरकारने कंटेन्मेंट क्षेत्र वगळता इतर ठिकाणी हळूहळू सर्व व्यवहार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात उद्यानही आहे. अकोल्यात मात्र रेड झोनमुळे उद्यान उघडणार नाही आणि पुढे पावसाळा असल्यामुळे दिवाळीपर्यंत पुन्हा उद्यानात जावून खेळण्याची संधी नाही. त्यामुळे मुलांचा चांगलाच हिरमोळ झाला आहे. 

 

अकोला शहरात सहा प्रमुख उद्यानं आहेत. त्यातील बहुतांश उद्यानांमध्ये महापालिकेतर्फे गेले दोन वर्षांपासून नुतनिकरणाचे काम सुरू आहे. नेहरू पार्क वगळता मुलांना खेळण्यासाठी फारसा वाव नाही. परिणामी रस्त्यावरच मुलांचा खेळ सुरू असतो. त्यातच यंदाची उन्हाळी सुटी चार भिंतीच्या आड घालवावी लागली. कुठे खेळण्याची संधी नाही. मामंच गावही यावर्षी दूरच राहिलं. फेब्रुवारीपासून सुरू असलेली ही घरातील कोंडी आता तरी सुटेल अशी आशा मुलांना नक्कीच होती. शाळा सुरू होण्यासाठी आणखी दोन-तीन आठवडे आहे. तोपर्यंत मुक्त खेळून ताजेतवाणे होण्याची संधी. तिही कोरोना विषाणूने घालवली. राज्यात इतर ठिकाणी उद्यानं सुरू होत असताना अकोल्यात मात्र उद्यानातील गेटवरील कुलं बंद राहणार असल्याने मुलांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.        

 

मोठ्यांच्या चुका, मुलांचा हिरमोड
कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात असतानाही नागरिकांनी निष्काळजीपणा केला. त्यामुळे अकोल्यात रुग्णांची संख्या वाढली. मोठ्यांनी केलेल्या या चुकांचे मोल मात्र लहान मुलांना चुकवावे लागत आहे. 

 

महानगरपालिकेला संधी 
यावर्षी उद्यानं कोरोनामुळे बंद आहेत. त्यामुळे पावसाळ्यात ही संधी साधून महानगरपालिकेतर्फे अकोला शहरातील सर्व मोठे उद्यानं दुरुस्त करून आणि तिथे हिरवळ वाढेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जेणे करून यंदाचा उन्हाळ्यात खेळण्याचा आनंद मुलांना लुटता आला नसली तरी पावसाळ्यानंतर जेव्हा उद्यानं सुरू होतील तेव्हा मुलांचा उद्यानात खेळण्याचा आनंद द्विगुणीत होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What the heck, last summer didn't get to play in the park and now ...