Video: बरेच दिवस झाले आपली गाठ-भेट नाही...माझ्यावर रुसलाय का तुम्ही...

विवेक मेतकर
Wednesday, 10 June 2020

कोरोनामुळे तुमची माझी ताटातूट झालीय ना... नका घाबरू... हळूहळू होईल सगळं नीट... तोपर्यंत काळजी घ्या... आपण कोरोनाला संयमाने घेऊयात. तोही रस्ता बदलून पळून जाईल कुठल्या कुठं...

अकोला :  बरेच दिवस झाले आपली गाठ-भेट नाही... बरेच दिवस... दिवस कशाला बऱ्याच महिन्यांत कुणी माझ्याकडे बघितलंही नाही... तासनतास वाट बघणारे...सीटसाठी भांडणारे कुणी येतही नाही... काय झालंय बाळांनो... माझ्यावर रुसलाय का तुम्ही...

किती दिवस झाले तुम्ही माझ्या नजरेसही पडला नाहीत... आधी कसे तुम्ही माझ्या अंगाखांद्यांवर खेळायचात... खिडकीतून रुमाल टाकून एखादं राज्य जिंकायचं तसं जागा जिंकायचात. त्या जिंकलेल्या जागेचा आनंद काही औरच असेल नाही का?.. खिडकीच्या सीटसाठीही भांडायचात... तासाभराच्या प्रवासातही गप्पा रंगायच्या... नव्या ओळखी व्हायच्या...आणि पिक-पाण्याच्या चौकश्याही... काही लोक खेळणी, मोबाईलचे कव्हर, पुस्तकं, कुरमुरे असं बरंच काही विकायला यायचे... कुणी शाळेला निघायचात..तर कुणी ऑफिसला...रस्ताभर कुणी मोबाईलवर सिनेमे बघत राहायचा...तर कधी गाणे ऐकत बसायचात..

 

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

उन्हाळ्यात घामेजल्या अंगाने तुम्ही प्रवास करायचात, पावसाळ्यात भिजल्या अंगाने बसून राहायचात... जागच्या जागी... रोजच्या रोज तुम्ही मला भेटायला यायचात... अगदी सणासुदीलाही मी तुमच्या सेवेत असायची... हो... सणासुदीवरून आठवलं... दसऱ्याला नाही का... तुम्ही माझ्या अंगाखांद्यांवर झेंडूची फुलं आणि आपट्यांच्या पानांची माळ घालायचात... सजवून टाकायचात मला... भर गर्दीतही पूजा करायचात... धुळवडीला माझ्याही सर्वांगावर रंगीबेरंगी संडा पडायचा... मोहरून जायचे मी...

तुम्हाला आठवतंय ? मी बसस्थानकात आले की हसू उमटायचं तुमच्या चेहऱ्यावर ... मला यायला थोडा उशीर झाला की बोटं मोडायचात माझ्याच नावाने... आणि अचानक अनाऊन्समेंट कानावर पडायची तुमच्या... मग तुम्ही बॅगा सावरत उभे राहायचात माझ्या स्वागताला... मी बसस्थानकात घुसली रे घुसली की मी थांबायच्या आतच गाडीत शिरायचात...काका हिच गाडी जाते का अकोटला असं म्हणत अत्यंत जवळचे मित्र-मैत्रीण खूप दिवसांनी भेटल्यावर गच्च मिठी मारावी तसं... रोज होत राहायचं असं...

पण आता नेमकं काय झालंय... सांगा ना... स्थानकं ओस पडलीयत... अनाऊन्समेटंचा आवाज नाही... तिकीट खिडक्या ओस पडल्यायत... ... तुम्ही घरात अडकून पडलाय आणि मीही यार्डात पडून राहिलीय एकाकी... तुमच्या-माझ्या प्रेमात हे कोण आलंय आडवं...

खूप उन्हाळे पावसाळे पाहिलेत आपण... चिखल पाण्यातूनही आपण चालत राहिलोय दुडक्या चालीनं अनेकदा... पण आपण एकमेकांची साथ सोडली नाही कधीच...

कोरोनामुळे तुमची माझी ताटातूट झालीय ना... नका घाबरू... हळूहळू होईल सगळं नीट... तोपर्यंत काळजी घ्या... आपण कोरोनाला संयमाने घेऊयात. तोही रस्ता बदलून पळून जाईल कुठल्या कुठं... मग तुमची पावलं येतीलच माझ्याकडे धावत... मीही स्वागताला असेन सजून-सवरून... कितीही केलं तरी माझा जन्म तुमच्यासाठीच आहे... आणि तुमचं जगणंही माझ्यासोबतच आहे... कारण, तुम्ही माझी लेकरं आहात... माय-लेकराची ताटातूट करण्याएवढं मोठं संकट जगात कधीच नसतं... तुम्हाला पुन्हा एकदा कुशीत घेऊन मी मिरवणार आहे... मोठ्या दिमाखात... भेटू मग लवकरच...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola st say, It's been a long time since we met ...