
एक दिवस आधीच वंचित बहुजन आघाडीच्या दोन माजी आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. योगायोगाने गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री राजेश टोपे अकोला जिल्हा दौऱ्यावर आलेत. त्यांना भेटण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे दोन प्रमुख पदाधिकारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेले होते. तेथे त्यांनी वंचितचे नेते बाळासाहेब आंबेडकर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून जिल्ह्यातील परिस्थितीबाबत त्यांना अवगत करणार असल्याचे सांगितले. तेव्हा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी त्या पदाधिकाऱ्यांजवळ बाळासाहेबांना माझा नमस्कार सांगा म्हणून निरोप दिला.
अकोला: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करण्याची एकही संधी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर सोडत नाही. त्याच आंबेडकरांच्या बालेकिल्यात त्यांच्याच अकोला पॅटर्नला धक्का देत दोन माजी आमदारांना पवार राष्ट्रवादीत घेवून गेले. पवारांच्या या राजकीय खेळीमुळे अकोला जिल्ह्यात बाळासाहेबांच्या सामाजिक अभियांत्रिकीला छेद जाण्याची शक्यता आहे. त्याची पूर्व कल्पना असल्याने त्यांनी ही दरी भरू काढण्यासाठी आधीपासूनच वेगवेगळे डावपेच आखले आहेत. मात्र तुर्तास तरी माजी आमदार हरिदास भेद आणि बळीराम सिरस्कार यांची जागा भरून काढणारा नेता बाळासाहेबांच्या पसंतीला उतरलेला नाही.
दोन्ही माजी आमदारांचा बुधवारी मुंबईत प्रवेश सुरू असताना इकडे बाळासाहेब आंबेडकर अकोल्यात ठाण मांडून होते. दोन दिवसांपासून ते अकोल्यातच आहेत. गुरुवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अकोला येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संदर्भात सर्व विभागांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्याच वेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता प्रा. धैर्यवर्धन पुंडकर आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे मंत्रीमहोदयांची भेट घेण्यासाठी तेथे पोहोचले. त्यांनी बाळासाहेबांचा निरोप मंत्र्यांना दिला.
अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
अकोल्यातील परिस्थितीबाबत व प्रशासनातील समन्वयाच्या अभावाबाबत त्यांनी बाळासाहेब नाराज असल्याचे सांगितले. याच प्रश्नावर बाळासाहेब जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे सांगितल्यानंतर आरोग्य मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे हे बाळासाहेबांना माझा नमस्कार सांगा असे म्हणून पुढे निघाले. राष्ट्रवादीने वंचितच्या दोन माजी आमदारांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अकोल्यात वंचितच्या नेत्यांकडून घेरण्याची योजना होती. मात्र कोरोनाचा मुकाबला करताना लढत असलेल्या या राष्ट्रवादीच्या मंत्र्याने दुरूनच नमस्कार करून वंचितची ही राजकीय खेळी उधळून लावली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.