अरे व्वा ! पंधरा दिवसांत साडेचार लाख रुपयांचा अवैध दारुसाठा जप्त, कुठ झाली कारवाई, वाचा...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

शहर व तालुक्याच्या वेगवेगळ्या भागात गावठी व देशी दारुची सर्रास विक्री करणाऱ्या 32 जणांच्या मुसक्या आवळत चार लाख 32 हजार रुपयांचा दारुसाठा जप्त केला आहे. अवैध दारू विक्रीची 21 प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आली आहेत. ही कारवाई बाळापूर पोलिसांनी पंधरा दिवसांत केली आहे.

बाळापूर (जि. अकोला) : शहर व तालुक्याच्या वेगवेगळ्या भागात गावठी व देशी दारुची सर्रास विक्री करणाऱ्या 32 जणांच्या मुसक्या आवळत चार लाख 32 हजार रुपयांचा दारुसाठा जप्त केला आहे. अवैध दारू विक्रीची 21 प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आली आहेत. ही कारवाई बाळापूर पोलिसांनी पंधरा दिवसांत केली आहे. 

क्लिक करा- तीन महिन्यांपासून गाडी घरातच होती...बाहेर काढली अन् वाढले पेट्रोलचे दर; मिशन बिगिन अगेनला इंधन दरवाढीची सलामी

हातभट्ट्यांविरोधात विशेष मोहीम
बाळापूर पोलिसांच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी देशी गावठी दारुची सर्रास विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. विशेषत: महामार्गावरी बार व ढाब्यांवर देशीदारू खुलेआम विक्री केली जात होती. त्याच बरोबर गावठी दारूचे अड्डेही वाढले होते. शहर व ग्रामीण भागात अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती बाळापूर पोलिसांना मिळताच पोलिसांकडून अवैध दारू विक्री आणि गावठी दारू बनवणाऱ्यांविरोधात ठिकठिकाणी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. पंधरा दिवसात गावठी दारू विक्रेते आणि हातभट्ट्यांविरोधात विशेष मोहीम असून, या कारवाईत 21 प्रकरणे दाखल करण्यात आले आहेत. यात सहा दुचाकीसह चार लाख 32 हजार 795 रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आला आहे. 

हेही वाचा- अरे हे काय! संशयावरून पोलिसांनी गोडाऊनवर छापा मारला अन् ही धक्कादायक बाब आली समोर

32 जणांना अटकही करण्यात आली 
पोलिस ठाण्यात अपुरे मनुष्यबळ असतानाही ही कारवाई करण्यात पथकांना यश आले आहे. या नंतरही जास्तीत जास्त कारवाई करण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे ठाणेदार नितीन शिंदे यांनी सांगितले आहे. 6 ते 21 मे या कालावधीत पथकांनी बाळापूर शहरासह कान्हेरी (गवळी), रिधोरा, व्याळा, वाडेगाव, मांडोली, गोरेगाव, चिंचोली (गणू), खिरपूरी, पारस, पारस फाटा, महामार्गावरील ढाबे अशा विविध ठिकठिकाणी धाडी टाकल्या. यात 21 गुन्ह्यांची नोंद केली आहे. यात काही बेवारस गुन्ह्यांचा समावेश आहे. या प्रकरणांमध्ये 32 जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय दारू तयार करण्यासाठी लागणारा गुळ, रसायन, तसेच तयार दारू, त्यासाठी वापरली जाणारी भांडी, ड्रम, बॅरल, पिंप आदी साहित्यही जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके, ठाणेदार नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, मनोज वासाडे व पोलिस कर्मचाऱ्यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Balapur police cracked down on illegal traders