हृदयद्रावक : एकाच सरणावर दिला दोघांना चिताग्णी; काय घडले असे...वाचा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 June 2020

जोरदार धडक झाल्याने यात ओम गजानन मोसंबे व अक्षय गजानन भाकडे असे दोघे जण जागीच ठार झाले होते.

जानेफळ (जि.बुलडाणा) : मेहकर-जानेफळ मार्गावर मोटरसायकल व पिकअप मालवाहू गाडीमध्ये झालेल्या अपघातात जानेफळ पोलिसांनी पिकअप गाडी चालकांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले. यावेळी जामिनावर त्याची सुटका करण्यात आली.

शुक्रवार (ता.१२) जानेफळ-मेहकर मार्गावर जिजामाता नगर नजीक मालवाहू पिकअप गाडी क्रमांक एम. एच. २८ बी. बी. ०५६० व मोटरसायकल क्रमांक एम.एच.२० ई झेड २९०४ दरम्यान जोरदार धडक झाल्याने यात ओम गजानन मोसंबे व अक्षय गजानन भाकडे असे दोघे जण जागीच ठार झाले होते तर अनंता दत्तात्रय रींढे व नागेश गजानन मोसंबे यांना गंभीर जखमी अवस्थेत मेहकर व नंतर तिथून औरंगाबाद येथे उपचारार्थ हलविण्यात आले होते. मृतक ओम गजानन मोसंबे व अक्षय गजानन भाकडे हे दोघे सुद्धा आपल्या आई-वडिलांना एकुलते एकच होते.

महत्त्वाची बातमी - लहान भावाच्या मृत्यूची वार्ता ऐकली अन् मोठ्यानेही सोडला प्राण

शवविच्छेदनानंतर रात्री उशीरा दोघांना एकाच सरणावर दोघांच्या वडिलांनी चिताग्नी दिला. या घटनेमुळे मोसंबे वाडी गावात एकही चुल पेटली नव्हती. या घटनेप्रकरणी लक्ष्‍मण यादवराव मोसंबे रा.वाडी यांनी जानेफळ पोलिस स्टेशनला फिर्याद दिली.

याप्रकरणी मालवाहू गाडी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपी वाहन चालक अनिल सुरेश सोनुने रा.शेगाव यास अटक करण्यात आली होती. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. पुढील तपास पोउनि. अशोक काकडे हे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cremation was given to both on the same place in buldana district akola marathi news