फेस मास्क न वापरता ते फिरत होते बेफिकीर, मग पोलिसांनी सुरू केली कारवाई अन्...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 June 2020

तालुक्यात कोरोनाचा प्रकोप वाढत असून, शुक्रवारी आणखी तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

मोताळा (जि.बुलडाणा) : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे. यानुषंगाने मोताळा शहरात महसूल, नगरपंचायत व पोलिस प्रशासनाने शुक्रवारी (ता.5) संयुक्तपणे कारवाईची मोहीम राबविली. यावेळी फेस मास्क न वापरणाऱ्या व्यक्ती व नियम मोडणाऱ्या दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

तालुक्यात कोरोनाचा प्रकोप वाढत असून, शुक्रवारी आणखी तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या सातवर पोहोचली आहे. परंतु काही जण फेस मास्क न वापरता बेफिकीरपणे फिरताना दिसत आहेत. नियम मोडणाऱ्या बहाद्दरांना धडा शिकविण्यासाठी तहसीलदार व्ही. एस. कुमरे, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विभा वऱ्हाडे, पोलिस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मोताळा शहरात संयुक्तपणे मोहीम राबविली. यावेळी सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क किंवा स्वच्छ रुमाल न बांधता फिरणाऱ्यांवर नगरपंचायत प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली. 

हेही वाचा - सहा महिन्यापूर्वीच घेतला होता त्यांनी आसरा, अन् घरमालकाचाच काढला काटा

सोबतच बोराखेडी पोलिसांनी दुचाकी चालकांवर कारवाईचा बडगा उगारला. दरम्यान, रस्त्याच्या कडेला ठराविक अंतर न ठेवता दुकाने लावून गर्दी करणाऱ्यांना दुकाने उचलायला लावली. प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे नियम मोडणाऱ्यांमध्ये धास्ती पसरली आहे. नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी एएसआय धांडे, पोकाँ लठाड, सुनील जाधव, चालक समीर शेख व नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punitive action against violators by borakhedi police in buldana district akola marathi news