राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा ‘श्रीगणेशा’ ऑक्टोबरमध्ये

प्रा.अविनाश बेलाडकर 
Friday, 3 July 2020

गेली चार वर्षे रखडलेले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास जाण्याची शक्यता अनलॉक दोन मुळे बळावली आहे. 2 हजार 404 कोटी रुपयांच्या या कामाच्या निविदा मंजूर झाल्या असून, एका कंपनीसमवेत करारही पूर्ण झाला आहे. या कामाला अॉक्टोबर पासून सुरुवात होण्याची शक्यता आहे.

मूर्तिजापूर (जि.अकोला),  : गेली चार वर्षे रखडलेले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास जाण्याची शक्यता अनलॉक दोन मुळे बळावली आहे. 2 हजार 404 कोटी रुपयांच्या या कामाच्या निविदा मंजूर झाल्या असून, एका कंपनीसमवेत करारही पूर्ण झाला आहे. या कामाला अॉक्टोबर पासून सुरुवात होण्याची शक्यता आहे.

युपीए शासनाच्या कार्यकाळात एल अँड टी कंपनीने सोडलेले हे काम मोदी शासनाच्या कार्यकाळात इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अँड फायनान्सीयल सर्व्हीसेस कंपनीला देण्यात आले होते. निधी/बँक लोन उपलब्ध न होऊ शकल्यामुळे या कंपनीनेही हे काम सोडले होते. अर्धवट अवस्थेतील या कामांमुळे या महामार्गाची पार दूर्दशा होऊन अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. किमान रस्त्याची एक बाजू पूर्ण होऊ शकली असती, तरी वाहतुकीची कुचंबणा टाळता आली असती. आता मात्र नव्याने श्रीगणेशा होऊन या कामाच्या चार टप्प्यांच्या चार निविदा तीन कंपन्यांच्या मंजूर झाल्या आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

पहिला टप्पा अमरावती (बडनेरा) पासून कुरणखेड पर्यंतचा आहे. दुसरा टप्पा कुरणखेड ते अकोला शहर असा आहे. या दोन्ही टप्प्यांची राजपत इन्फ्रा या कंपनीची निविदा मंजूर झाली आहे. अकोला ते नांदुरा या तिसऱ्या टप्प्यांची निविदा मोंटे कार्लो या कंपनीची, तर नांदुरा ते चिखली (मलकापूर) या चौथ्या टप्प्याची निविदा कल्याण टोल्स या कंपनीची मंजूर झाली आहे. शासनाने या कंपन्यांच्या काम करण्याच्या तयारीला स्वीकृती दिली आहे. शासन आणि कंपन्यांदरम्यान व्हावयाच्या करारांची प्रक्रिया सुरू झाली आहे.

शेळद(अकोला) ते नांदुरा या तिसऱ्या टप्प्याचे काम करणाऱ्या मोंटे कार्लो कंपनीच्या करारावर स्वाक्षरी झाली आहे. स्वाक्षरी झाल्यानंतर कंपन्यांवर या कामाचे कायदेशीर बंधन येते. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाकडून महामार्गाचे हस्तांतरण होईल व त्यानंतर महिनाभरात बँक हमी प्राप्त झाल्यानंतर वर्क ऑर्डर निघून अॉक्टोबर महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

वर्षभरात पूर्णत्वास जाण्याची शक्यता
दोन हजार 404 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. चारही टप्प्यांचा खर्च प्रत्येकी कमीअधीक 600 कोटी रुपयांचा असेल. वर्षभरात काम पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे.

तीन टोल नाके
महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातच टोल नाक्यांच्या इमारत उभारणीचा समावेश आहे. अमरावती पासून चिखली (मलकापूर) पर्यंतच्या सुमारे 250 किलोमिटर अंतरात कुरणखेड, तरोडा कस्बा आणि दसरखेड अशा तीन ठिकाणी टोल नाके असतील.

कंपन्यांवरच मेंटेनन्सची जबाबदारी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या अमरावती ते चिखली दरम्यानच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी चार कंपन्यांची नियुक्ती झाली आहे. एका कंपनी समवेत करार पूर्ण झाला. उर्वरीत करार १५ दिवसात पूर्णत्वास जातील. अॉक्टोबर 2020 पर्यंत कामाला सुरूवात होईल. मेंटेनन्सची जबाबदारी या कंपन्यांची असेल.
- पी. डी. ब्राह्मणकर, प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण.

"महामार्गाचे काम लांबल्यामुळे आपघातांचे प्रमाण वाढले आहे. साईडपट्ट्या किमान भरल्या जाव्यात, अशी मागणी करणारे पत्र प्रकल्प संचालकांना दिले होते. काल त्यांच्याकडून लेखी उत्तर मिळाले. नव्याने काम लवकरच सुरू होईल, परंतु तोपर्यंत डागडुजीचे काम थांबणार नाही, या शब्दात त्यांनी काल पाठविलेल्या पत्रान्वये आश्वस्त केले."
-द्वारकाप्रसाद दुबे, नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष मूर्तिजापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ‘Shriganesha’ of four-laning of akola National Highway in October