आनंदी आनंद गडे, धरणं भरली विदर्भाकडे; पश्‍चिम विदर्भात १६ धरणे भरली शंभर टक्के

अनुप ताले
Thursday, 3 September 2020

‘जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे! झुळझुळणारे गवत पोपटी, लवलवणारे तुरे! नवी लकाकी झाडांवरती, सुखात पाने-फुले नाहती, पाऊसवारा झेलीत जाती भिरभिरती पाखरे! जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे!’
अकोलाच नव्हे तर बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, अमरावती येथील तुडूंब भरलेली जलाशये आणि खळखळणारे झरे, भरभरून वाहणाऱ्या नद्या अन् मनाला मोहून टाकणारी हिरवळ पाहून, शंकर वैद्य यांच्या या कवितेच्या या ओळी आपसूकच प्रत्येकाच्या मनाचा आणि ओठांचा ठेका घेत असतील हे मात्र नक्की....

अकोला : एरव्ही कोरडी ठणं राहणारी धरणे आता तुडूंब भरली असून, पश्‍चिम विदर्भातील एकूण १६ धरणे १०० टक्के भरली आहेत तर, अकोला जिल्ह्यातील महत्त्वाच्या काटेपूर्णा धरणात बुधवारी (ता.२) सकाळपर्यंत ९८.४० टक्के जलसाठा निर्माण झाल्याची नोंद आहे.

 

गेल्या दशकापासून मॉन्सूनचे आणि पर्यायाने पावसाचे बिघडलेले चक्र शेती तसेच नागरी वस्त्यांसाठी चिंतेचे कारण बनत गेले आहे. दरवर्षी आखूड होत चाललेला पावसाळा आणि कमी पर्जन्यमान यामुळे दुष्काळी परिस्थितीला अकोला वासीयांसह वैदर्भीयांना सामोरे जावे लागत होते. मात्र गेल्या दोन वर्षात पाऊस पडण्याचे प्रमाण वाढले असून, यंदा तर, पश्‍चिम विदर्भात एकूण १६ धरणे शंभर टक्के भरली आहेत. अकोला जिल्ह्यात तीन प्रमूख धरणं शंभर टक्के भरली असून, अकोला शहराला पाणी पुरवठा करणारे काटेपूर्णा धरण ९८.४० टक्के भरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, बहुतांश भागात पिण्याच्या पाण्याची समस्याही निकाली निघाली आहे.

 

शंभर टक्के भरलेली धरणे

जिल्हा धरणाचे नाव
अकोला मोर्णा, निर्गुणा, उमा
यवतमाळ पूस प्रकल्प, सायखेडा, वाघाडी, बोरगांव, नवरगांव
वाशीम सोनल, एकबुर्जी
बुलडाणा तोरणा, उतावळी, कोराडी, मस, पलढग, ज्ञानगंगा

 

या प्रकल्पांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक जलसाठा

जिल्हा प्रकल्पांची नावे
अकोला       काटेपूर्णा, घुंगशी बॅरेज
यवतमाळ       बेंबळा, गोकी
बुलडाणा       मन

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 16 dams in West Vidarbha are 100 percent full