कोरोनाच्या दोन महिन्यांच्या लढाईत 38 बळी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

अकोलेकरानो भविष्यातील संकट ओळखा ः भयावह स्थितीकडे अकोल्याची वाटचाल

अकोला  ः जिल्ह्यात 7 एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून सुरू झालेल्या या लढाईला ७ जून रोजी दोन महिने पूर्ण झाले आहेत. दोन महिन्यात जिल्ह्यात तब्बल 832 रुग्ण आढळले असून, 38 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचे संक्रमण थैमान घालत असून, रुग्णांच्या आकडा 800 पार गेला आहे. तर 38 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेले बहुतांश रुग्ण हे मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि इतर आजारांनी ग्रासलेले होते. मृतांमध्ये सर्वाधित रुग्ण हे 60 वर्षे वयाच्या पुढची आहेत. जिल्ह्यात एप्रिलअखेरपर्यंत कोरोनाचे चार बळी गेले होते. मात्र मे महिन्याच्या सुरुवातीपासून हा आकडा वाढत गेला. जूनच्या पहिल्याच आठवड्यातही कोरोनाची दहशत कायम असल्याचे दिसून येत आहे.

चिमुकलेही कचाट्यात
कोरोनाच्या संक्रमणाने चिमुकल्यांनाही कचाट्यात घेतले आहे. अगदी दोन ते तीन वर्षांच्या लहान मुलांनाही कोरोनाची लागण झाली आहे. वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार दोन महिन्यात तब्बल शंभर चिमुकले आणि किशोरवयीन मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.

व्हेंटीलेटरही तोडकेच
जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यासोबच मृतकांचा आकडा सुद्धा 38 वर पोहचला आहे. त्यानंतर सुद्धा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सहाय्यक ठरणाऱ्या व्हेंटिलेटरची संख्या दहाच आहे. परिणामी भविष्यात रुग्णसंख्या वाढल्यास उपलब्ध व्हेंटिलेटरची व्यवस्था तोडकी ठरू शकते.

खासगी व्हेंटिलेटर अधिग्रहित करण्याचा पर्याय
जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर आहेत. आवश्‍यकता भासल्यास जिल्हा प्रशासन खासगी डॉक्टरांचे व्हेंटिलेटर अधिग्रहत करुन शकते. त्यामुळे प्रशासना समोर व्हेंटिलेटरसाठी दुसरा पर्याय उपलब्ध आहे. परंतु अद्याप प्रशासनाने त्यादृष्टीने कामच सुरु न केल्याचे दिसून येत आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 38 killed in two months of Corona fighting