खरिपासाठी ७५ हजार शेतकरी पीक कर्जाच्या रांगेत

अजूनही ५२ टक्के पीककर्ज वाटप बाकी; आतापर्यंत ६६६ कोटीचे वितरण
Crop loan
Crop loanSakal

अकोला - यावर्षी खरिपात बँकांद्वारे जिल्ह्यातील एक लाख ४४ हजार ३५० खातेदार शेतकऱ्यांना पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. दोन आठवड्यात खरिपाच्या पेरणीलासुद्धा सुरुवात होणार आहे. मात्र, अजूनही ७४ हजाराहून अधिक शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण बाकी असून, बँकांकडून आतापर्यंत उद्दिष्टाच्या केवळ ४८ टक्के म्हणजे ६६६.५० कोटी रुपयांचे ६९ हजार ६८० शेतकऱ्यांना पीककर्ज वितरित केले आहे.

दरवर्षी पीककर्ज मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना बँकांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. हजारो शेतकरी कोणत्या ना कोणत्या कारणाने दरवर्षी पीककर्ज मिळण्यापासून वंचित राहतात. त्यामध्ये प्रामुख्याने थकबाकीदार म्हणून बँकांद्वारे शेतकऱ्यांना पीककर्ज नाकारले जाते. यावर्षी बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठा महागण्यासोबतच मजुरीसुद्धा वाढली. शिवाय गेल्यावर्षी खरिपात विविध कारणांनी सोयाबीन, कापूस, मूग, उडिदाची उत्पादकता घटल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुद्धा बिकट होती. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना बँकांकडून पीककर्ज मिळणे अत्यावश्‍यक होते. परंतु, अपेक्षेच्या उलट चित्र जिल्ह्यात यावर्षी पाहायला मिळत असून, ३० मे पर्यंत केवळ ४८.६४ टक्के म्हणजे, ६६६.५० कोटी रुपयांचे ६९ हजार ६८० शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण करण्यात आले असून, ७४ हजार ६७० शेतकरी अजूनही खरिपासाठी पीककर्जापासून वंचित आहेत.

बँकांनी असे केले पीक कर्ज वितरण

जिल्ह्यात खरिपामध्ये एकूण एक लाख ४४ हजार ३५० खातेदार शेतकऱ्यांपैकी ६९ हजार ६८० खातेदार शेतकऱ्यांना जिल्ह्यातील सर्व बँकांमिळून १३७० कोटी उद्दिष्टापैकी ६६६.५० कोटी रुपये म्हणजे ४८.६४ टक्के पीक कर्ज वितरित केले. त्यामध्ये नागरी क्षेत्रातील बँकांनी ५३ हजार ६५० खातेदारांपैकी ८ हजार ६४० खातेदारांना ४९५ कोटी उद्दिष्टापैकी ७७.८१ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित केले. खासगी बँकांनी ५७०० खातेदारांपैकी २५८ खातेदारांना ७० कोटी उद्दिष्टापैकी ४ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित केले. विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेनी १५ हजार खातेदारांपैकी १२ हजार ५७१ खातेदारांना १३० कोटी उद्दिष्टापैकी १३५.५७ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित केले तर, जिल्हा बँकांनी ७० हजार खातेदार शेतकऱ्यांपैकी ४८ हजार २११ शेतकऱ्यांना ६७५ कोटी उद्दिष्टापैकी ४४९.१२ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com