esakal | शेतकऱ्यांचे ७८ लाख शासनाच्या तिजाेरीत!
sakal

बोलून बातमी शोधा

fund

शेतकऱ्यांचे ७८ लाख शासनाच्या तिजाेरीत!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकाेला ः जिल्ह्यात मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊसासह गाटपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील फळपिकांचे नुकसान झाले होते. सदर अवकाळी पाऊस पातूर, मूर्तिजापूर, बाळापूर आणि बार्शीटाकळी तालुक्यात झाला होता. त्यामुळे संबंधित तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे करण्यात आले आहे व नुकसानग्रस्तांसाठी मदत निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. परंतु अद्याप जिल्ह्यातील १ हजार १८८ शेतकऱ्यांनी मदत मिळाली नसल्याने ते मदतीची प्रतीक्षा करत आहेत. संबंधित शेतकऱ्यांची ७८ लाख ७ हजार रुपयांची मदत शासनाच्या तिजोरीतच आहे. (78 lakh farmers in government coffers!)

जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका कायम आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या नित्याच्याच झाल्या आहेत. गेल्या पाच-सहा वर्षांपासून दुष्काळ, अतिवृष्टी व किडींच्या न चुकणारा फेरा यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणींच्या दुष्टचक्रात सापडला आहे. पीक कितीही चांगले आले तरी घरात येईपर्यंत शाश्वती नाही. यामुळे अस्मानीसह शेतकऱ्यांना सुलतानी संकटाला सुद्धा सामाेरे जावे लागते. जिल्ह्यात अशा संकटाला सामाेरे गेलेल्या हजाराे शेतकऱ्यांचे लाखो रुपये शासन दरबारी अडकून पडले आहेत. त्यामुळे आधीच निसर्गाच्या काेपामुळे घायल झालेला शेतकरी या वर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या नुकसानाची मदत मिळण्याची आस लावून बसला आहे. परंतु अद्याप त्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

शासनाकडे प्रलंबित असलेली मदत
- मार्च, एप्रिल आणि मे २०२१ मध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे बागायती पिकांचे नुकसान झाले होते. यावेळी पंचनामा केल्यावर ६१ गावांमधील ५०४.७५ हेक्टरवरिल पिकांची क्षती झाली होती. १ हजार ११४ शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसला होता. संबंधित शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शासनाकडे ६८ लाख १४ हजार १२५ रुपयांचा मागणी करण्यात आली आहे.
- मार्च, एप्रिल आणि मे २०२१ मध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील २७ गावांमधील ५५.१६ हेक्टरवरील फळ पिकांचे नुकसान झाले होते. २७ गावातील शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला होता. संबंधितांसाठी ९ लाख ९२ हजार ८८० रुपयांची मदत निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.

असे झाले होते नुकसान
- अवकाळी पावसामुळे बाधित गावे - ७५
- नुकसानग्रस्त शेतकरी - १ हजार १८८
- बाधित क्षेत्र - ५५९.९१ हेक्टर
- अपेक्षित निधी - ७८ लाख ७ हजार

या बागायती व फळ पिकांना बसला होता फटका
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे हरभरा, ओवा, गहू, भाजीपाला, कांदा इत्यादी बागायती क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. त्यासोबतच पपई, लिंबू, मोसंबी, डाळींव इतर फळ पिकांचे नुकसान झाले होते.

तौक्ते बाधितांना मदतीचे वाटप
मे महिन्यात आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील शेती पिकांसह घरांचे नुकसान झाले होते. संबंधित नुकसानग्रस्तांसाठी मदत करण्यासाठी शासनाकडून जिल्हा प्रशासनाला ५७ लाख १६ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. सदर निधी अकोला, अकोट, तेल्हारा व बार्शीटाकळी तालुक्यातील तहसीलदरांना वर्ग करण्यात आला त्याचे वाटप सुद्धा करण्यात येत आहे.

संपादन - विवेक मेतकर

78 lakh farmers in government coffers!

loading image