कृषीमंत्र्यांनी केला शेतकऱ्यांचा भ्रमनिरास; काय असेल त्याचे कारण? ते जाणून घ्याचं

प्रा.अविनाश बेलाडकर
Sunday, 30 August 2020

साधारणतः दुपारी एकच्या दरम्यान मंत्रीमहोदयांचा ताफा आला. तीन तास आतुरतेने वाट पहाणारे शेतकरी बांधव सजग झाले. स्वागताची तयारी करून पुढे सरसावणार, तर मंत्रीमहोदयांचा ताफा अनभोरा गावासमोरून सुसाट अकोल्याकडे निघून गेला.

मूर्तिजापूर (अकोला) : ते आले, ठरल्याप्रमाणे न थांबताच सूसाट निघून गेले आणि भ्रमनिरास झालेल्या शेतकऱ्यांचा सत्कार कृषी शास्त्रज्ञांच्या हस्ते पार पडला. राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे शनिवारी अमरावतीहून अकोल्याकडे जातांना सकाळी १० ते १०.४५ दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील मूर्तिजापूर तालुक्यातील अनभोरा येथील सेवार्थ ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या सभागृहात महिला शेती शाळेअंतर्गत महिलांशी संवाद साधणार होते. रानभाजी महोत्सवात सहभागी शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वितरीत करणार होते व यंदाच्या खरीप हंगामात घरचे सोयाबीन पेरणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करणार होते.

ठरल्या वेळेपेक्षा तब्बल तीन तासांनी साधारणतः दुपारी एकच्या दरम्यान मंत्रीमहोदयांचा ताफा आला. तीन तास आतुरतेने वाट पहाणारे शेतकरी बांधव सजग झाले. स्वागताची तयारी करून पुढे सरसावणार, तर मंत्रीमहोदयांचा ताफा अनभोरा गावासमोरून सुसाट अकोल्याकडे निघून गेला. संवादाच्या प्रतिक्षेतील महिला शेतकरी, प्रमाणपत्र स्विकारण्यासाठी आतूर रानभाजी महोत्सवात सहभाग देणारे व यंदाच्या हंगामात घरचे सोयाबीन पेरल्याबद्दल पाठीवर कौतुकाची थाप घेण्यासाठी उत्सुक शेतकरी बांधव भ्रमनिरास होऊन घरी परतले. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी पाच शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप केले, किटकनाशकांची फवारणी करणाऱ्या १० मजुरांना संरक्षण किट  वितरीत केली व महिला शेतकऱ्यांच्या शेतीशाळेला मार्गदर्शन केले.   

मूर्तिजापूरचे तालुका कृषी अधिकारी श्री. बेंडे म्हणाले, वरिष्ठांच्या निर्देशानुसार नियोजित संवाद, सत्कार, कौतुक सोहळा आयोजित केला होता. अमरावतीहून निघायला उशीर झाल्यामुळे व अकोल्यात महत्वाची मिटींग असल्यामुळे मंत्रीमहोदय थांबू शकले नसल्याची शक्यता आहे.
 
संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture Minister Dadaji Bhuse left without visiting the farmers of Murtijapur taluka