हंगामाच्या सुरुवातीलाच दुबार पेरणीचा फास!

अनुप ताले
Tuesday, 23 June 2020

यंदा मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करीत असूनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी हिम्मत जुटवली. मात्र पेरणी आटोपताच पावसाने आठवडाभराची दांडी मारल्याने आणि अनेक ठिकाणी बियाणे उगवले नसल्याने, हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.
 

अकोला : यंदा मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करीत असूनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी हिम्मत जुटवली. मात्र पेरणी आटोपताच पावसाने आठवडाभराची दांडी मारल्याने आणि अनेक ठिकाणी बियाणे उगवले नसल्याने, हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.

निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेत अपात्र ठरविल्या गेले. पात्र ठरले त्यांचेपैकी सुद्धा 40 टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही. बँकांनी शेतकऱ्यांसाठी दरवाजे बंद केल्याने 70 टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज मिळाले नाही. हरभरा, तूर चुकाऱ्याचे कोट्यवधी रुपये शासनाच्याच तिजोरीत पडून आहेत तर, लाखो क्विंटल कापूस शासनाने खरेदी केला नसल्याने शेतकऱ्यांच्याच घरात पडून खराब होत आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न निर्माण झाला. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी खरीप पेरण्यासाठी हिम्मत लावली. मात्र पावसाने आणि बोगस बियाणे विक्रेत्या कंपन्यांनी त्यांचा खरिपाच्या सुरुवातीलाच घात केला. सलग तीन दिवस पाऊस पडल्याने आणि जिल्ह्यात सरासरी 75 मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याने, 18 जून पर्यंत जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद पेरणी आटोपली. मात्र पेरणीनंतर पावसाने आठवडाभराची दांडी मारल्याने पेरण्या उलटल्या असून, अनेक ठिकाणी बियाणे उगविले नसल्याने दुबार पेरणीची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे.

बियाणे कंपन्यांनीही केला घात
यावर्षी शेतकऱ्यांची आर्थिक टंचाई असतानाही कंपन्यांनी 100 ते 390 रुपयांनी बियाण्यांचे दर वाढविले. गेल्या हंगामात अतिवृष्टीने पीक खराब झाल्याने शेतकऱ्यांच्या घरचे बियाणे सुद्धा उपयोगात आणता येत नसल्याने हे महाग बियाणे विकत घ्यावे लागले. मात्र या बियाण्यापैकी काही ठिकाणी 40 तर काही ठिकाणी केवळ 10 टक्केच बियाणे उगविले आहे. त्यामुळे बियाणे कंपन्यांनी सुद्धा यंदा शेतकऱ्यांची फसवणूक व लूट केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

एकरी 40 किलोपर्यंत सोयाबीनची उन्हारी
यावर्षी सोयाबीन बियाण्याची गुणवत्ता कमी असल्याचे सांगितले जात असल्याने, शेतकऱ्यांनी एकरी 30 ऐवजी 40 किलोपर्यंत बियाण्याची पेरणी केली. तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली असून, 70 ते 80 टक्के बियाणे उगवले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात वरुणराजाची चांगली कृपा झाली. त्यामुळे 15 जून रोजी आम्ही पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दांडी मारल्याने व बियाणे सुद्धा बोगस निघाल्यामुळे माझ्यासह परिसरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे.
- बबनराव महादेव सयाम, शेतकरी, कानशिवनी

कोरोना नंतर आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. अतिवृष्टीच्या तडाख्याने नुकसान होऊन घरगुती बियाण्याची गुणवत्ता ढासळली व सिंगल सर्टिफाइड बियाणे सुद्धा बोगस निघाले. पावसानेही दांडी मारली आहे. त्यामुळे कानशिवनी, देवळी शिवार, येळवन, एरंडा व तालुक्यातील इतरही ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.
- शंकरराव दोनवडे, शेतकरी, कानशिवनी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Double sowing at the beginning of the season!