खरिपाच्या सुरुवातीलाच पावसाचा फटका, चार दिवसांपासून पावसाची दांडी; पेरण्या उलटणार

सकाळ वृत्तसेेवा
Monday, 22 June 2020

आठवड्यात सलग तीन दिवस पावसाने हजेरी लावल्याने, टक लावून बसलेला शेतकरी आनंदला अन् ७५ मिमी पावसाची नोंद होताच पेरणीला सुरुवात केली. मात्र पावसाने यंदाही शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण घालत, खरिपाच्या सुरुवातीलाच पेरणीनंतर चार दिवस दांडी मारून शेतकऱ्यांचा घात केला आहे.

अकोला :  आठवड्यात सलग तीन दिवस पावसाने हजेरी लावल्याने, टक लावून बसलेला शेतकरी आनंदला अन् ७५ मिमी पावसाची नोंद होताच पेरणीला सुरुवात केली. मात्र पावसाने यंदाही शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण घालत, खरिपाच्या सुरुवातीलाच पेरणीनंतर चार दिवस दांडी मारून शेतकऱ्यांचा घात केला आहे.

गेल्या तीन ते चार वर्षापासून ऋतूचक्र विस्कळीत झाल्याने, मॉन्सूनपूर्व आणि मॉन्सूनच्या आगमनात मोठी तफावत निर्माण झाली. दोन वर्षांपासून मॉन्सूनपूर्व पावसाने दांडीच मारल्याने खरिपातील पेरणीपूर्व कामांवर मोठा परिणाम झाला. त्यानंतर उशिरा मॉन्सूनचे आगमन व उशिरापर्यंत मुक्काम यामुळे हंगामातील पेरण्या व पीक काढण्याची वेळ सुद्धा बदलत गेली. त्यामुळे तीन ते चार वर्षापासून पावसाच्या लहरीपणाने शेतकऱ्यांना सातत्याने नुकसान सोसावे लागत आहे. यावर्षी योग्यवेळी मॉन्सूनचे आगमन होणार असून, पिकांना पोषक पर्जन्यमान राहणार असल्याचे संकेत हवामान विभागाने वर्तविले होते. मात्र यंदाही पावसाने शेतकऱ्यांचा हिरमोड केला आहे. जुनच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यासह विदर्भात मॉन्सून सक्रिय झाला. त्यानुसार सलग तीन दिवस पावसाने बऱ्यापैकी हजेरी सुद्धा लावली.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

पेरणीसाठी आवश्यक किमान ६५ मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला झपाट्याने सुरुवात केली. मात्र त्यानंतर सलग चार दिवसांपासून पावसाने दांडी मारल्यामुळे पेरण्या खोळंबल्या असून, झालेली पेरणीसुद्धा उलटण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे यंदा खरिपाच्या सुरुवातीलाच पावसाच्या लहरीपणाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

दोन दिवस पावसाची शक्यता धुसर
साधारणपणे १७ व १८ जून रोजी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी आटोपली. मात्र त्यानंतर पावसाने दांडी मारली असून, अचानक आर्द्रतेचा टक्का घटल्याने, अजूनही पुढील दोन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola onset of rains at the beginning of the kharif, four days of rain; Sowing will be reversed