
अकोला : तलाठ्यांचे आजपासून बेमुदत आंदोलन
अकोला : जिल्ह्यातील ३१ तलाठ्यांची एक वेतनवाढ रोखल्यामुळे तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी गौण खनिज संबंधी कामांवर पूर्णतः बहिष्कार टाकला आहे. परंतु त्यानंतर सुद्धा जिल्हा प्रशासन तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावरील कारवाई मागे घेण्यास तयार नसल्याने सोमवार पासून तलाठी व मंडळ अधिकारी बेमुदत असहकार आंदोलन करणार आहेत, परंतु सदर आंदोलन काळात शेतकऱ्यांची कामे व ऑनलाईनची कामे मात्र तलाठ्यामार्फत करण्यात येतील. जिल्हा प्रशासनाच्या कोणत्याच मिटींगला तलाठी हजर राहणार नाहीत.
जिल्ह्यात अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा घालण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांची तालुका पातळीवर स्थायी व भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. यात नियुक्त तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या विविध प्रकारच्या मागण्या जिल्हा प्रशासनाने मंजूर केल्या नाहीत. उटल महाखनिज ॲप डाउनलोड करून रजिस्ट्रेशन न केल्याने २ मे रोजी जिल्ह्यातील चार मंडळ अधिकारी यांची एक वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली. त्यासोबतच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने ५ मे रोजी उपविभागीय अधिकारी यांनी ५ मंडळ अधिकारी व २६ तलाठ्यांवर कारवाई केली.
सदर कारवाईचा निषेध करण्यासाठी विदर्भ पटवारी संघ, जिल्हा शाखा अकोला व विदर्भ मंडळ अधिकारी संघ जिल्हा शाखा अकोला यांच्या वतीने आंदोलनाला सुरूवात करण्यात आली आहे. सदर आंदोलनाअंतर्गत तलाठी व मंडळ अधिकारी यांनी काळ्या फिती लावून काम केले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवशीय धरणे दिले. परंतु त्यानंतर सुद्धा प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने सोमवारपासून तलाठी बेमुदत असहकार आंदोलन करणार आहेत.
याच कामांना सहकार
तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचा २३ मे पासून ऑनलाईन एनएलआरएमपी कामकाज, नैसर्गिक आपत्ती, निवडणूक ही कामे वगळता अन्य कार्यालयीन कामांबाबत बेमुदत असहकार राहील. कोणत्याही शासकीय बैठकांना उपस्थित राहणार नाहीत. याव्यतिरिक्त जिल्हा प्रशासनामार्फत मागण्यात आलेली माहिती सुद्धा तलाठ्यामार्फत देण्यात येणार नाही.
Web Title: Akola 31 Talathis And Mandal Officers Agitations For Blocking Pay Hike
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..