
Akola : अकोला-अकोट रस्त्यावरील पुलाचे बांधकाम पूर्ण करा
अकोला : अकोला-अकोट महामार्गावरील पूर्णा नदीवर गांधीग्राम गावाजवळ बांधण्यात येत असलेला लहान पूल ५ मार्च २०२३ पूर्वी पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग तसेच कंत्राटदार यांना बैठकीत दिले.
याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिली आहे. त्यामुळे आमदार सावरकर यांनी याबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
अकोला-अकोट मार्गावरील वाहतूक गांधीग्राम येथील पुल क्षतीग्रस्त झाल्यामुळे प्रभावित झाली आहे. त्यामुळे अकोला -अकोट महामार्गावरील रखडलेल्या कामाच्या संदर्भात आमदार रणधीर सावरकर यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व कंत्राटदारासोबत आढावा बैठक घेतली.
अकोला ते गांधीग्राम मार्गा दरम्यान सात ठिकाणी खंडित असलेल्या रस्त्याचे काम ३० मार्च २०२३ पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यात यावे तसेच अकोला ते पाचमोरी दरम्यान महामार्गावर रस्ता दुभाजक बांधण्यात यावा तत्पूर्वी मात्र वाहतूक सुरळीत होण्याचे दृष्टीने रस्त्याच्या या लांबीमध्ये दोन्ही बाजूला साईड पट्ट्यांचे काम सुद्धा ३० मार्च २०२३ पूर्वी पूर्णा करण्यात यावे, अशा सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी दिल्या.
अकोला ते अकोट रस्त्याची वाहतूक गोपालखेड मार्गे जात असल्याने गांधीग्राम ते गोपालखेड दरम्यानचा रस्ता प्रचंड वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाल्याने गोपालखेड ग्रामस्थांची नाहक निर्माण झालेली
अडचण दूर करण्यासाठी तसेच या परिसरातील पानेट येथील महाशिवरात्री यात्रा उत्सवासाठी जाणाऱ्या भाविक भक्तांना सुद्धा नाहक अडचणी सामना करावा लागू नये तसेच वाहतूक सुरळीत व्हावी या करिता या मार्गावरील पडलेले खड्डे तातडीने बुजविण्यात यावे, अशा सूचना सुद्धा आमदार रणधीर सावरकर यावेळी दिल्या.
संबंधित कामांचा अहवाल त्वरित सादर करण्याचे निर्देश सुद्धा त्यांनी यावेळी दिले.