Akola : अकोला-अकोट रेल्वेचा प्रवास बुधवारपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola

Akola : अकोला-अकोट रेल्वेचा प्रवास बुधवारपासून

अकोला : गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील पुलाला तडे गेल्याने रस्ता वाहतूक थाबविण्यात आली. त्यामुळे अकोला-अकोट दरम्यान प्रवास करणाऱ्यांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला. आता मात्र, अकोटपर्यंत ये-जा करण्यासाठी रेल्वे गाडी उपलब्ध होणार आहे. अकोला-अकोट दरम्यान आठ डब्ब्यांची गाडी बुधवार, ता. २३ नोव्हेंबरपासून धावणार आहे. या प्रवासासाठी ३० रुपये मोजावे लागणार आहे. ही गाडी अकोला-अकोट दरम्यान तीन स्थानकावर थांबेल, अशी माहिती दक्षिण-मध्ये रेल्वेचे डीआरएम उपेंद्रसिंग यांनी रविवारी दिली.

दक्षिण-मध्ये रेल्वेचे नांदेड विभागाचे डीआरएम उपेंद्रसिंग यांनी रविवारी अकोला येथे आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल यांची भेट घेतली. अकोला-अकोट दरम्यान रेल्वे गाडी सुरू करण्यासंदर्भातील सर्व सुरक्षा चाचण्या झाल्या असून, रेल्वे स्थानकांचीही पाहणी करण्यात आली आहे. त्यामुळे बुधवार, ता. २३ पासून आठ डब्ब्यांची गाडी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी उपस्थित आमदारांना दिली.

ही गाडी सुरू करण्यासाठी बुधवारी अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक सहावर उद्‍घाटन सोहळा आयोजित केला जाणार आहे. या सोहळ्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे ऑनलाईन गाडीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करतील. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे दक्षिण मध्य रेल्वेचे हैदराबाद विभागाचे डीआरएम ऑनलाईन उपस्थित राहणार आहे.

उद्‍घाटन सोहळा भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल आदींच्या उपस्थितीत होणार आहे.

सकाळी ६ व सायंकाळी ६ वाजता धावणार गाडी

अकोला ते अकोट दरम्यान तुर्तास आठ डब्ब्याच्या गाडीच्या दोन फेऱ्या सुरू करण्यात येणार आहे. ता. २३ नोव्हेंबर रोजी उद्‍घाटन झाल्यानंतर गुरुवारपासून सकाळी ६ वाजता निघेल आणि अकोटला सकाळी ७.२० ला पोहोचेल.

सायंकाळी ६ वाजता अकोला येथून अकोटकरीता रेल्वे गाडी रवाना होईल व अकोट येथे रात्री ७.२० ला पोहोचेल. परतीच्या मार्गात अकोट येथून सकाळी ८ वाजता गाडी अकोल्याकडे निघेल व अकोला येथे ९.२० ला पोहोचेल. रात्री अकोट येथून ९.२० वाजता अकोल्याकडे निघेल तर रात्री १० वाजता अकोल्याला पोहोचेल. ही गाडी अकोला ते अकोट दरम्यान दोन्हीकडे उगवा, गांधी स्मारक आणि पाटसूल येथे थांबणार आहे.

आमदारांसोबतच्या बैठकीत झाले नियोजन

दक्षिण-मध्ये रेल्वेच्या नांदेड विभागाचे डीआरएम उपेंद्रसिंग यांनी रविवारी अकोला येथे आमदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीत अकोट रेल्वे सुरू करण्यासंदर्भात चर्चा करून उद्‍घाटनाचे नियोजन करण्यात आले. बैठकीला आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, भाजप महानगराध्यक्ष विजय अग्रवाल आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या समस्यांकडेही वेधले लक्ष

मध्य रेल्वे आणि दक्षिण-मध्य रेल्वेची लाईन जोडणे शिवनी येथे शेड उभारणी करणे

अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म नंबर सहावरील शेड वाढवणे

अकोला-अकोट दरम्यानच्या गाडीच्या वेळा बदलविणे आणि गाड्याच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची मागणी

अकोला ते खंडवा गेज परिवर्तनाचे काम सुरू आहे. त्यापैकी अकोला-अकोट दरम्यानचे काम पूर्ण झाले असून, सुरक्षा प्रमाणपत्रही मिळाले आहे. त्यामुळे अकोला-अकोट दरम्यान प्रवाशी गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला.या गाडीच्या प्राथमिक स्वरुपात दोन फेऱ्या होणार आहे. मागणी व आवश्यकतेनुसार त्यात वाढ केली जाईल. तीन स्थानकावर गाडी थांबवणार असून, जास्तीत जास्त ३० रुपये तिकीट राहिल.

- उपेंद्रसिंग, डीआरएम, नांदेड विभागा, दक्षिण-मध्य रेल्वे

टॅग्स :AkotAkolarailway