
Akola : लम्पीने घेतला १५९६ जनावरांचा बळी
अकोला : जनावरांवर लम्पी या विषाणूजन्य चर्मरोगाने हल्ला चढविला आणि राज्यासह देशभरात हजारो जनावरांचे बळी गेले. अकोला जिल्ह्यातही लम्पीचा मोठा फटका बसला असून, आतापर्यंत १५९६ लम्पीमुळे जनावरांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या प्रादूर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने उपचार व लसीकरणाच्या स्वरुपात पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून युद्धस्तरावर प्रयत्न केले. अकोला जिल्ह्यातही आतापर्यंत अडीच लाख जनावरांचे लसीकरण झाले असून, प्रादूर्भाव घटल्याचे चित्र आहे. मात्र, शेकडो जनावरांच्या मृत्यूमुळे झालेल्या वेदना अजूनही शेतकऱ्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत आहेत.
देशात २०१९ मध्ये कोरोनाने प्रवेश केला आणि आतापर्यंत त्याची झळ देशवासी सोसत आहेत. आतापर्यंत लाखो लोकांचे बळी कोरोनाने घेतले. मात्र, देशात युद्ध पातळीवर लसीकरण व उपचार मोहिमेतून या महामारीवर नियंत्रण मिळविण्यात शासनाला यश आले. त्यानंतर मात्र, विषाणूजन्य आजाराने पशुंकडे मोर्चा वळविला आणि लम्पी या विषाणूजन्य चर्मरोगाने देशात जनावरांवर हल्ला चढविला.
लम्पीचा संसर्गही मोठ्या झपाट्याने देशभरात पसरला. महाराष्ट्रातही लम्पीने प्रचंड नुकसान केले. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सुद्धा सुद्धा शासनाने त्वरित यंत्रणेला सक्रिय केले व लसीकरण मोहिम राबवित बऱ्यापैकी नियंत्रण मिळविले. अकोला जिल्ह्यात सुद्धा लम्पीने चांगले पाय पसरत २८ हजार ४१ जनावरे बाधीत झाले. त्यामध्ये सर्वाधिक प्रादूर्भाव अकोट, तेल्हारा व बाळापूर तालुक्यात आढळून आल्याचे पशुसंवर्धन विभागाकडे नोंद आहे.
बाधीत जनावरांपैकी उपचारातून २४ हजार ११९ जनावरे दुरुस्त झाले असून, २३२० जनावरांवर उपचार सुरू आहे. मात्र, इतर जनावरांवर प्रादूर्भाव होऊ नये यासाठी प्रामुख्याने प्रतिबंधात्मक उपाय करणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असल्याने, लसीकरण मोहिम राबवित आतापर्यंत दोन लाख ५६ हजार ६३१ जनावरांचे लसीकरण सुद्धा जिल्ह्यात करण्यात आले आहे. अजूनही पशुसंवर्धन विभागाकडे ३० हजार लसीचे डोस उपलब्ध असून, लहान जनावरांमध्ये त्यातून लसीकरण केले जात असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जि.प.) डॉ. गजानन दळवी यांनी दिली.
९१३ पशुपालकांना सव्वा दोन कोटीची मदत
अकोला जिल्ह्यात आतापर्यंत १५९६ जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू झाल्याची नोंद पशुसंवर्धन विभागाकडे असून, त्यानुसार शासनस्तरावरून संबंधित ९१३ पशुपालकांना मदत म्हणून, आतापर्यंत दोन कोटी २६ लाख ३८ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात आतापर्यंत २८ हजार ४१ जनावरे लम्पीमुळे बाधीत झाले असून, त्यापैकी १५९६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. २४ हजार ११९ जनावरे दुरुस्त झाले असून, २३२० जनावरांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत दोन लाख ५६ हजार ६३१ जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण सुद्धा झाले आहे. उपचाराकरिता मुबलक प्रमाणात औषधीसाठा उपलब्ध असून, सध्या जिल्ह्यात प्रादूर्भाव नियंत्रणात आहे.
- डॉ. गजानन दळवी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प. अकोला