अकोला बनते अवैद्य धंद्याचे हॉटस्पॉट, जुगार, वरली-मटका आणि अवैध दारूची वाहतूक

सकाळ वृत्तसेेवा
शनिवार, 4 जुलै 2020

अकोला कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून उदयास तर आलेच आहे सोबतच आता अनलॉकमध्ये हा जिल्हा गुन्हेगारीसोबतच अवैध धंद्याचे हॉटस्पॉट म्हणून उदयास येत आहे. कारण मागील काही दिवसापासून अवैध धंद्याला ऊत आला असून, यावर वचक बसविण्यासाठी सलग कारवाया करण्यात आल्या आहेत.

अकोला :  अकोला कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून उदयास तर आलेच आहे सोबतच आता अनलॉकमध्ये हा जिल्हा गुन्हेगारीसोबतच अवैध धंद्याचे हॉटस्पॉट म्हणून उदयास येत आहे. कारण मागील काही दिवसापासून अवैध धंद्याला ऊत आला असून, यावर वचक बसविण्यासाठी सलग कारवाया करण्यात आल्या आहेत.

खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुल्लानी चौक जिराबावडी खदान येथे सुरू असलेल्या जुगार अड्डयावर शहर पोलिस उपअधीक्षक यांच्या पथकाचे प्रमूख अमित डहारे यांनी छापा टाकला. या जुगार अड्डयावरून 4 जुगारींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुध्द खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच मागील काही दिवसापासून जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक मिलिंदकुमार बहाकर यांच्या पथकाने ग्रामीण भागातील धंद्यावर छापा टाकण्याचे सत्र सुरू ठेवले आहे. काही दिवसापूर्वी आलेगाव येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर तर त्याआधी अकोट, हिवरखेड, मूर्तिजापूर आदी ठिकाणी कारवाया करून जुगाऱ्यांना अटक केली आहे. सोबतच तब्बल 15 लाख रुपये किंमतीचा गुटखाही जप्त केला होता. तेव्हा अकोला जिल्ह्यात विशेषतः शहरासह ग्रामीण भागात सध्या अवैध धंद्याना ऊत आला असल्याचे दिसून येत आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

भर बाजारात सुरू होता जुगार
अकोला शहरातील मुख्य भाजी बाजारात सुरू असलेल्या जुगारावर जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांचे विशेष पथकाचे प्रमूख पोलिस निरीक्षक मिलींदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने जनता बाजारातील जुगार अड्डयावर धाड टाकली. या ठिकाणावरील नऊ जुगारींविरुध्द कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गोवंशाची वाहतूक अन गुटखाही येतो शहरात
सिव्हिल लाईन्स पोलिसांनी कारवाई करीत सहा गोवंशाना जीवदान दिले. अशातच काही दिवसापूर्वी विशेष पथकाने शहरात येत असलेला गुटखा जप्त केला होता. तर अवैध दारू विक्री ही नित्याचीच असन, त्यावरही अधून-मधून कारवाया केल्या जात आहे. हे आणि असे अनेक अवैध धंदे शहरात सुरू असून पथके ऍक्‍टीव्ह असून, स्थानिक पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola becomes a hotspot for illicit trade, gambling, worli-matka and smuggling of illicit liquor