
अकोला : ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा रास्ता रोको
अकोला : ओबीसी आरक्षणावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघत आहे. मध्य प्रदेशमध्ये ओबीसी आरक्षण लागू झाले असताना महाराष्ट्रात राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणापासून नागरिकांनी वंचित राहावे लागत असल्याचा आरोप करीत अकोला शहरात भाजपतर्फे गुरुवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यात आमदारांसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांनी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करून ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे, यासाठी आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
महाविकास आघाडी सरकर ओबीसी आरक्षणाचे मारेकरी आहे, असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. जनतेशी बेईमानी करून महाजनादेशाचा अपमान करीत सत्तारूढ झालेल्या तीन पक्षांकडून अपेक्षातरी काय करणार, असा प्रश्न उपस्थित करीत आमदार सावरकर यांनी ओबीसी आरक्षणबाबात भाजप कटिबद्ध असल्याचे सांगितले. डॉ. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथील लोकनायक जयप्रकाश नारायण चौकात भाजपच्या वतीने ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी रस्ता रोको करण्यात आला.
भाजपचे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्यासह या आंदोलनात भाजपचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. भाजपचे सत्ता असलेल्या मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात निकाल लागताच आरक्षण मिळविण्यासाठी तातडीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून ओबीसींना न्याय मिळवून दिला. परंतु दोन महिने झाल्यावर सुद्धा महाविकास आघाडी सरकरातर्फे महाराष्ट्रातील ओबीसी जनतेला त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी कोणतीही हालचाल करता आली नाही, असा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री व माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वारंवार सूचना करून सुद्धा त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून महाविकास आघाडी ओबीसीसह समाजातील अठरा पगड जाती समाजावर अन्याय करत असल्याचा आरोपसुद्धा यावेळी आमदार सावरकर यांनी केला. मध्यप्रदेशला जमले ते महाराष्ट्राला का करता येत नाही? देशपातळीवर राजकारणाची भाषा करणारे ओबीसींचे नेते सध्या कुठे आहेत, असाही सवाल भाजपचे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल अग्रवाल यांनी केला.