27 प्रकल्प भरले तुडूंब, जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये आश्वासक पाणीसाठा

अरूण जैन 
Saturday, 15 August 2020

जिल्ह्यात आजवर झालेला समाधानकारक पावसामुळे प्रकल्पांमध्ये आश्वासक असा पाणीसाठा निर्माण झाला आहे. दोन मध्यम प्रकल्प व २५ लघुपाटबंधारे प्रकल्प तुडुंब भरले असल्याने शेतकऱ्यांची रब्बीच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे.

बुलडाणा  ः जिल्ह्यात आजवर झालेला समाधानकारक पावसामुळे प्रकल्पांमध्ये आश्वासक असा पाणीसाठा निर्माण झाला आहे. दोन मध्यम प्रकल्प व २५ लघुपाटबंधारे प्रकल्प तुडुंब भरले असल्याने शेतकऱ्यांची रब्बीच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे.

अनेक प्रकल्प क्षेत्रांमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये चांगला पाणीसाठा निर्माण झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यात तीन मोठे व सात मध्यम प्रकल्प आहेत. या मोठ्या प्रकल्पांमध्येही पुरेसा पाणीसाठा निर्माण झालेला आहे.

नळगंगा प्रकल्प मध्ये आज ५९ टक्के, पेनटाकळी मध्ये ७४ टक्के तर खडकपूर्णा प्रकल्पांमध्ये ७७ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. मराठवाड्यात व इतरत्र होत असलेल्या पावसामुळे खडकपूर्णा प्रकल्पाचा पाणीसाठा वाढत आहे. भावी काळातील अडचणी व नुकसान लक्षात घेऊन प्रकल्पाच्या वतीने सांडव्यातून पाणी सोडले जात आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

नदी काठावरील गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आजही पाच वक्रद्वारे खुली करून त्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांपैकी मस व उतावळी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. याशिवाय पलढग मध्ये ५७ टक्के, ज्ञानगंगामध्ये ८८ टक्के, कोराडीमध्ये ८१ टक्के ,मन प्रकल्पामध्ये ९१ टक्के, तोरणामध्ये ६२ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे रब्बीच्या पिकांची व सिंचनाची चिंता मिटल्यात जमा आहे. आगामी काही दिवसात उर्वरित प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरतील असा विश्वास आहे.

२५ लघुप्रकल्प शंभर टक्के
पूर्ण क्षमतेने भरलेल्या लघु प्रकल्पांमध्ये अंचरवाडी, मांडवा, पिंपळगाव चिलम खा, केशव शिवणी, सावखेड भोई, ढोरपगाव, हिवरखेड १, हिवरखेड ३, टाकळी, चोरपांग्रा, चिखली, जागदरी, गारडगाव, पांगरी, केसापूर, खळेगाव, झरि, बोधेगाव, मासरूळ, पिंपळगाव नाथ, कंडारी, ब्राह्मणवाडा, निमखेड व गणेश पुर या प्रकल्पांचा समावेश आहे.

नियमित पावसामुळे पिकेही जोमदार
यावर्षी जिल्ह्यात पावसाने सर्वच तालुक्यांमध्ये समाधानकारक हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे पिकांना आवश्‍यक असणाऱ्या वेळी पाऊस बरसत आहे. शिवाय सूर्यप्रकाशही पुरेशा मिळत असल्याने पिकांची वाढ ही उत्तम झालेली आहे.
(संपादन - विवेक मेतकर)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Buldana 27 projects filled Tudumba, assured water storage in projects in the district