निविदा मंजुरीवरून गदारोळ, ‘अमृत’मध्ये तक्रारी असलेल्या कंपनीलाच पुन्हा कामाचे कंत्राट; शिवसेनेने नोंदविला फलक झळकावून निषेध

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 24 June 2020

महानगरपालिका क्षेत्रात जलवाहिनी टाकण्यासाठी अमृत योजनेतून केल्या जात असलेल्या कामांबद्दल सर्वच नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. त्यानंतरही त्यात कंपनीला हद्दवाढीतील जलवाहिनी टाकण्याच्या कामाचे कंत्राट देण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. त्याचा निषेध नोंदवित शिवसेना सदस्यांनी शहरातील रस्त्यांची अवस्था दर्शविणारे फलकच मंगळवारी (ता.२३) स्थायी समिती सभागृहात झळकावले. त्यामुळे सभेत एकच गदारोळ झाला

अकोला  ः महानगरपालिका क्षेत्रात जलवाहिनी टाकण्यासाठी अमृत योजनेतून केल्या जात असलेल्या कामांबद्दल सर्वच नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. त्यानंतरही त्यात कंपनीला हद्दवाढीतील जलवाहिनी टाकण्याच्या कामाचे कंत्राट देण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. त्याचा निषेध नोंदवित शिवसेना सदस्यांनी शहरातील रस्त्यांची अवस्था दर्शविणारे फलकच मंगळवारी (ता.२३) स्थायी समिती सभागृहात झळकावले. त्यामुळे सभेत एकच गदारोळ झाला.

अकोला शह पाणीपुरवठा योजनेंतर्गत हद्दवाढ भागात शिवर येथे ३५५ मिलीमीटर व्यासाची एटडीपीई जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यासाठी ११ नोव्हेंबर २०१९ रोजी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसा तीन निविदा मनपाला प्राप्त झाल्यात. त्यात अमृत योजनेंतर्गत अकोला शहर जलवाहिनी टाकणाऱ्या एपी ॲण्ड जिपी असोसिएट या कंपनीचाही समावेश होता. या कंपनीची निविदा ही सर्वाधिक कमी दराने असल्याने निविदा स्वीकृतीसाठी मंगळवारी स्थायी समिती सभेत विषय मांडण्यात आला होता. सुमारे १.७५ कोटी रुपयांच्या या कामाची निविदा शहरातील सर्वच नगरसेवकांच्या तक्रारी असलेल्या कंपनीलाच देण्याबाबत शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा यांनी आक्षेप घेतला. त्यांनी अमृत योजनेत अकोला शहरात झालेल्या कामांमुळे रस्त्यांची अवस्था व जलवाहिन्यांची स्थिती दर्शविणारे फलकच स्थायी समिती सभागृहात आणले होते. त्यामुळे सभागृहात एकच गदारोळ झाला.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

विषय वेगवेगळे असल्याने चर्चा नाकारली
अमृत योजनेतून करण्यात आलेली कामे आणि शिवरमध्ये टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीचा विषय वेगळा असल्याने त्याची एकत्रीत चर्चा करण्यास सभागती सतिष ढगे यांनी नकार दिला. अमृत योजनेवर वेगळी चर्चा करण्यासाठी वेळ देवून शिवसेनेचा विरोध असतानाही विषय मंजूर केला.

नागरिकांच्या हितासाठी निर्णय
शिवरमध्ये सध्या आठ ते दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो. त्यामुळे येथे जलवाहिनी टाकण्याचे काम तातडीने करण्याची गरज आहे. त्यामुळे या विषयाला विरोध न करता नागरिकांच्या हिताचा निर्णय घेण्याची विनंती नगरसेवक अनिल मुरूमकार यांनी सभागृहाला गेली.

या विषयांनाही मंजुरी
- गुडधी, सांगळुत राज्य महामार्गालगतची जलवाहिनी स्थलांतरीत करण्याच्या कामास मंजुरी.
- प्रभाग क्रमांक ११ मधील अंलकार मार्केट येथे आर.एस. मार्केटिंग ते जनता बँक मेन रोडपर्यंत आरसीसी नाला व कलव्हर्ट बांधणे.
- प्रभाग १९ मध्ये नागे ले-आऊट सभागृह ते म्हाडा कॉलनीमधील मुख्य नाल्यापर्यंत नाला बांधकामाला मंजुरी.
- कंत्राटी पद्धतीने मनपा प्रशासनासाठी मनुष्यबळ पुरवठा करण्याकरिता मंजुरी निविदेला कार्योत्तर मंजुरी.
- कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या मे. इम्पेक्स ग्लोबल इन कार्पोशन अकोला व मे. साहिल इंडस्ट्रिज, भोसरी पुणे या कंपनीला मुदत वाढदेण्यास कार्योत्तर मंजुरी देणे.
- प्रभाग क्रमांक १६ मध्ये निमवाडी भागात मिनी बायपास ते कैलास टेकडी नाल्यापर्यंत नाला बांधकाम करणे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Controversy over tender approval, re-contracting of the same company with the complaint in ‘Amrut’; Shiv Sena reports protest by flashing placards