esakal | वाटीवर वाटी, वाटीत रवा... कोरोनाले घेऊन जाय महादेवा !
sakal

बोलून बातमी शोधा

pola

वाटीवर वाटी, वाटीत रवा... कोरोनाले घेऊन जाय महादेवा !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बाळापूर (जि. अकोला) : ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती असली तरी कोरोनामुळे पोळा भरत नसल्याने शेतकऱ्यांच्या या कलागुणांवर पाणी फिरले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांवर ‘वाटीवर वाटी, वाटीत ठेवला रवा... अन् या कोरोनाले घेऊन जाय महादेवा...! अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

‘आज अवतन घ्या, अन् उद्या जेवायला या’ अशा प्रकारचे आमंत्रण पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना दिले जाते. मात्र कोरोनामुळे दोन वर्षापासून बैलांना जेवणाचे अवतनच न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. बैलांचा शृंगार करून त्यांची मिरवणूक काढून कृषी संस्कृतीचे दर्शन घडविणारा पोळा सण शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण समजला जातो.

हेही वाचा: 'त्या' घटनेनंतर ५ लाख शिखांनी अफगाणिस्तान सोडले होते...

पोळ्याच्या आदल्या दिवशी शेतकरी तूप किंवा तेल आणि हळद लावून बैलाचे खांदे शेकतात. ‘आज अवतन घ्या, अन् उद्या जेवायला या’ अशा प्रकारचे आमंत्रण पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना दिले जाते. मात्र कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षी प्रमाणे यंदाही वृषभराजांना जेवणाचे आमंत्रणच मिळाले नाही.

ग्रामीण भागात बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांचा सर्वांत मोठा सण पोळा साजरा करण्यात येतो. पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते. तळ्यावर किंवा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे.

पोळा नसला तरी बैलांचा शृगांर होणारच!

जिल्हा प्रशासनाने सरकारच्या आदेशानुसार कोरोना संकटात बैल पोळा भरविण्यास मनाई केली आहे. त्यामुळे गावागावांत भरणारा पोळा सलग दुसऱ्या वर्षी भरताना दिसणार नाही. मात्र, शेतकऱ्यांना वर्षभर साथ देणाऱ्या वृषभ राजाला पोळ्याच्या दिवशी शृंगार न करता ठेवणे शेतकऱ्यांचा पचनी पडणारे नाही. त्यामुळे अधिकृतपणे पोळा भरणार नसला तरी शेतकऱ्यांना बैलांचा सजविण्याची संपूर्ण तयारी केली आहे.

loading image
go to top