शहरी क्षेत्रात 93 तर ग्रामीणमध्ये 3 टक्केच कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ रोगाची शहरी क्षेत्रात ९३ टक्के व ग्रामीण क्षेत्रात ३ टक्केच लागण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सभेत दिली.

अकोला  ः जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ रोगाची शहरी क्षेत्रात ९३ टक्के व ग्रामीण क्षेत्रात ३ टक्केच लागण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सभेत दिली.

महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या सोमवारी (ता. १५) पार पडलेल्या सभेत कोरोना विषाणूचा ग्रामीण भागातील प्रभाव व त्यावर बदल्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यात आली. सभेत उपाध्यक्ष सावित्री राठोड यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्याचे निर्देश आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

कोविड-१९ उपाययोजनांसाठी ग्रामीण भागासाठी ३ कोटी ६१ लक्ष ६३ हजार रुपये मिळाले. त्यापैकी २ कोटी ५५ लक्ष १४ हजार रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. ग्रामीण भागातील १५ वैद्यकीय अधिकारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सेवा देत असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे. त्यामुळे त्यांची सेवा त्वरीत रद्द करण्याचा निर्णय समितीच्या सभेत घेण्यात आला. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य व अर्थ समिति सभापती सावित्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या समितीच्या सभेला पुष्पा इंगळे, अर्चना राऊत, प्रमोदीनी दांदळे, गोपाळराव भटकर, अनंतराव अवचार, गणेशराव बोबळे, अकोला पंचायत समिति सभापती वसंतराव नागे आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.वाय. असोले यांनी कामकाज पार पाडले.

ग्रामपंचायतींवर कारवाईची मागणी
शासनाच्या निर्देशावर आणि जिल्हा परिषदेने वारंवार सांगितल्यानंतरही ग्रामपंचायतींकडे असलेल्या चौदाव्या वित्त आयोगाचा निधी आरोग्यावर ज्या ग्रामपंचायतींनी खर्च केला नाही त्या ग्रामपंचायत सचिवावर फौजदारी तर ग्रामपंचायतवर कार्यवाही करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा सदस्य पुष्पा इंगळे यांनी आरोग्य समितीच्या सभेत केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Corona infection is 93 per cent in urban areas and 3 per cent in rural areas