
अकोला : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा पूर्णत: बोजवारा उडालेला असून, पोलीस प्रशासन पूर्णतः अपयशी ठरले आहे, अशी संतप्त टीका अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी सोमवारी राज्याच्या विधानसभेत जोरदारपणे केली. पावसाळी अधिवेशनात गृहविभागाच्या कामकाजावर चर्चा सुरू असताना आ. पठाण यांनी जिल्ह्यातील वाढते गुन्हेगारीचं प्रमाण, अमली पदार्थांची खुलेआम विक्री आणि पोलिसांची निष्क्रियता या मुद्द्यांवर सरकारला चांगलेच धारेवर धरले. ‘सकाळ’ने विविध बातम्यांच्या माध्यमातून जिल्हयातील गुन्हेगारीचा पाढाच मांडला होता. त्याची दखल घेत आमदार साजिद खान पठाण यांनी अधिवेशात मुद्दा उपस्थित केला हे विशेष.