Akola : प्रियकराच्या मृत्यूनंतर प्रेयसीनेही कवटाळले मृत्यूला Akola death lover After Saath Jienge Saath Marenge | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Akola : प्रियकराच्या मृत्यूनंतर प्रेयसीनेही कवटाळले मृत्यूला

बाळापूर : त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघांनीही प्रेमाच्या आणाभाका घेतल्या.... कायम सोबत राहण्याचा निश्चय केला.... घरून विरोध होता म्हणून ते पळूनही गेले... मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते... दोघांनीही विष प्राशन केले.

पहिल्या दिवशी प्रियकराचा आणि पाच दिवसांनी प्रेयसीचाही मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना आहे बाळापूर तालुक्यातील उरळ येथे. दोघांनीही उरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा जवळ विष प्राशन केले होते. त्यामुळे अधुऱ्या प्रेम कहाणीमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अतुल संजय बायधणे (रा. संगाई बाजार, अकोट फैल, अकोला) या युवकाचे उरळ पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावामधील अल्पवयीन मुलीसोबत प्रेम संबंध जुळले होते. त्यांच्या प्रेमात भेटीगाठी सुरू झाल्या.

काही दिवसांनी या दोघांच्या नात्याबाबत गावात कुणकुण सुरू झाली. दबक्या आवाजात दोघांच्या संबंधाबाबत चर्चा होऊ लागली. मात्र म्हणतात ना सत्य आणि प्रेम कितीही लपवलं तरी एक ना एक दिवस समोर येतच. अखेर हे संबंध मुलीच्या कुटुंबीयांना माहिती व्हायला काही वेळ लागला नाही. मुलीच्या घरच्यांनी मुलाला भेटायला मनाई केली. दोघांच्या भेटीगाठीवर बंधनं आली.

साथ जिएंगे साथ मरेंगे

विरहामुळे दोघांचाही जीव कासाविस व्हायचा. अखेर त्या दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. ठरल्या प्रमाणे दोघेही ३१ डिसेंबर २०२२ रोजी पुणे येथे पळून गेले. मुलगी अल्पवयीन असल्याने मुलीच्या वडिलांनी याबाबत उरळ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली.

त्यानुसार मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. मृतक अतुलच्या वडिलांनी या प्रेमीयुगलांना १६ फेब्रुवारी रोजी पुण्यावरून अकोला येथे आणले होते. २० फेब्रुवारी रोजी हे प्रेमीयुगल उरळ पोलिस ठाण्यात हजर होणार होते. मात्र सदर प्रेमी युगलांनी उरळ पोलिस स्टेशन समोर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रा समोर १८ फेब्रुवारी रोजी विषारी औषध प्राशन केले.

अधूरी एक कहाणी...

एकमेकांना भेटणे, तासन्‌तास एकमेकांशी बोलत बसणे, एकांतात रंगवलेली स्वने सांगणे, असा नित्यक्रम सुरू असतानाच या प्रेमीयुगलांनी नैराश्‍येतून भलतेच पाउल उचलले. दोघांनीही विष प्राशन केले. पहिल्या दिवशी त्याचा मृत्यू झाला व त्यानंतर वतीनेही उपचारादरम्यान जगाचा निरोप घेतला. भातुकलीच्या खेळाप्रमाणे त्यांचा डाव अर्ध्यावरच मोडला.