Akola : शिंदे गटातील निधीच्या वादावरील बैठक पुढे ढकलली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shinde group postpones meeting

Akola : शिंदे गटातील निधीच्या वादावरील बैठक पुढे ढकलली

अकोला : विकास निधीवरून शिवसेनेच्या शिंदे गटात सुरू असलेल्या वादावर ताेडगा काढण्यासाठी गुरुवार, ता.२३ फेब्रुवारी राेजी मुंबईत बैैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, आता ही बैठक एक दिवस पुढे ढकलण्यात आली असून, आता शुक्रवार, ता. २४ फेब्रुवारी रोजी मुंबईतच ही बैठक आयोजित केले जाणार असल्याची माहिती आहे.

माजी आमदार तथा संपर्क प्रमुख गाेपीकिशन बाजाेरीया यांच्यावर निधी वितरणात त्यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्षांनी थेट कमिशनखोरीचा आराेप केला होता. आरोप करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हाध्यक्ष अश्विन नवले, महानगराध्यक्ष याेगेश अग्रवाल, शशिकांत चाेपडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी होते.

त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठलेल्या पत्रातून हा आरोप केला हाेता. त्यानंतर वाशीम जिल्हा दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असता विमानतळावरही या पदाधिकाऱ्यांनी भेटून त्यांची बाजू मांडली होती. मुख्यमंत्र्यांच्या दरबारात विषय पोहोचल्याने त्यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी गुरुवारी मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात होते. त्यात सर्वांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते.

मुंबईत हाेणाऱ्या बैठकीत सर्व बाबी स्पष्ट करू, असे संपर्क प्रमुख गाेपीकिशन बाजाेरीया यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. जिल्हाप्रमुख गटाकडून कागदपत्रे गाेळा करण्यात आली असून, हे कागदपत्रे आता मुंबईतील बैठकीत सादर केले जाणार होते.

मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व प्रमुख नेते सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत व्यस्त असल्याने बैठकच एक दिवस पुढे ढकलण्यात आली असून, नेत्यांनी शुक्रवारी मुंबईत हजर होण्यास सांगण्यात आले असल्याची माहिती आहे.