Police Transfer : अकोला जिल्ह्यातील २०२ पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या akola district 202 police employee transfer | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police

Police Transfer : अकोला जिल्ह्यातील २०२ पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

अकोला - गेले अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांची यादी अखेर पोलिस अधीक्षकांनी मंगळवारी रात्री अंतिम मोहर लावून जाहीर केली. ग्रामीणमधून शहरात येण्यास उत्सुक असलेल्या अनेकांची यात लॉटरी लागली तर काहींना अद्यापही प्रतीक्षेत रहावे लागत आहे. शहरातील अनेक कर्मचाऱ्यांना ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये काम करण्याची संधी देण्यात आली आहे.

अकोला पोलिस दलाचे प्रमुख म्हणून पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी सूत्र स्वीकारल्यानंतर प्रथमच पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या केल्यात. एकाच वेळी २०२ कर्मचाऱ्यांना बदलीचे आदेश मंगळवार, ता. ६ जून रोजी देण्यात आले. यात अनेकांना शहरातून ग्रामीणमध्ये तर ग्रामीणमधून शहरात बदली देण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षकांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच प्रशासकीय स्तरावर मोठा निर्णय घेत बदल्या करताना कोणताही वाद उद्‍भवू नये याची काळजी घेतली आहे. ज्या पोलिस कर्मचाऱ्यांचा विहित कालावधी पूर्ण झाला व ते बदलीस पात्र होते अशाच कर्मचाऱ्यांचा सर्वसाधारण बदलीमध्ये समावेश करण्यात आला आहे. यात वाहतुक शाखेतील कर्मचाऱ्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

वाहतुक शाखेचे एएसआय विलास पांडे यांना बोरगाव मंजू पोलिस स्टेशन येथे बदली देण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर पोलिस मुख्यासलयातील एएसआय सागर बंडू देशमुख यांना वाहतूक शाखेत नियुक्ती देण्यात आली. याशिवाय पोलिस हेडकॉन्स्टेबल, पोलिस नाईक, पोलिस कॉन्स्टेबल व महिला पोलिस कर्मचाऱ्यांचाही या २०२ बदली झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये समावेश आहे.

वर्षभरानंतर ११ कर्मचारी कार्यमुक्त

गतवर्षी म्हणजे २०२२ च्या उन्हाळ्यात तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी केलेल्या बदल्यांमधील ११ कर्मचारी अद्यापही कार्यमुक्त झाले नव्हते. त्यांना तब्बल वर्षभरानंतर कार्यमुक्त करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले आहेत.

कार्यमुक्त करण्यास होते टाळाटाळ

प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या सर्वसाधारण बदल्यांमुळे अनेक पोलिस स्टेशनच्या कारभारावर परिणाम होतो. त्यामुळे मर्जितील पोलिस कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यास संबंधित ठाणेदार टाळाटाळ करताना आढळून येतात. यावेळी मात्र पोलिस अधीक्षकांना बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करून तसा पुर्तता अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार किती कर्मचाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त केले जाते, याकडे पोलिस विभागाचे लक्ष लागले आहे.