अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू घेणार विचारवंतांच्या गाठीभेटी

मनोज भिवगडे
Thursday, 11 June 2020

राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व असलेल्या पालकमंत्री या पदाची जबाबदारी सांभाळताना स्वतःच्या मतदारसंघासोबतच पालकत्व असलेल्या जिल्ह्याच्या विकासाची दिशाही निश्‍चित करावी लागते. त्याच उद्देशातून आता अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्ह्यातील विचारवंतांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले आहे.

अकोला : राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व असलेल्या पालकमंत्री या पदाची जबाबदारी सांभाळताना स्वतःच्या मतदारसंघासोबतच पालकत्व असलेल्या जिल्ह्याच्या विकासाची दिशाही निश्‍चित करावी लागते. त्याच उद्देशातून आता अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्ह्यातील विचारवंतांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले आहे. त्यातून ते जिल्‍ह्याच्या विकासवर मंथन घडवून आणण्याचा प्रयत्न तर करणार आहेच, शिवाय या जिल्ह्याच्या गरजा काय हेही जाणून घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे. 

 

 

बच्चू कडू या नावाला एक वलयं आहे. सामान्यातील नेता म्हणून असलेली कडू यांची ओळख अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यापासून या जिल्ह्याला बघावयास मिळाली नव्हती. आता मात्र पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील विकासाच्या गरजा कोणत्या, याचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी या जिल्ह्यातील विचारवंतांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. त्यातून ते सामाजिक मंथन घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. या जिल्ह्याच्या गरजा व विकासाचा अनुशेष दूर करण्याच्या दृष्टीने कोणती पावले उचलता येतील, यासाठी सामाजिक कार्यकर्ते व विचारवंतांना सोबत घेवून चालण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 

 

ही तर सुरवातच !
पालकमंत्री बच्चू कडू मंगळवार, बुधवारी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. संजय खडक्कार यांच्यासोबत पश्‍चिम विदर्भातील अनुशेषाबाबत चर्चा केली. सामाजिक कार्यकर्ते डॉ.नीलेश पाटील, नेहरू पार्कचे संचालक बी.एस. देशमुख यांच्यासोबत विविध सामाजिक विषयांवर चर्चा झाली. मनपा कर्मचाऱ्यांच्या व्यथा व अकोल्यातील सामाजिक चळवळीबाबत धनंजय मिश्रा यांनी विचार मांडले. ही तर एक सुरवात होती. यासारख्या सामाजिक विचार मंथन बैठकांमधून या जिल्ह्याच्या विकासाची दिशा निश्‍चित करण्यासाठी येत्या मंगळवारी (ता. 16) पालकमंत्री बच्चू कडू नेहरू पार्क येथे सामाजिक कार्यकर्ते व शहरातील विचारवंतांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती आहे. 

 

राजकीय स्टंट ठरू नये
अकोला जिल्हा विकासाच्या दृष्टीने बराच मागे राहिला आहे. त्याचे प्रमुख कारण येथे 25 ते 30 वर्षांपासून निर्माण झालेली दूरदृष्टी असलेल्या राजकीय नेत्यांची पोकळी होय. केवळ राजकारण करण्यावरच येथील नेत्यांनी भर दिला आहे. त्यामुळे पालकमंत्री बच्चू कडू यांनी अकोला जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने उचलले पाऊल हे राजकीय स्टंट ठरू नये, अशी अपेक्षा अकोल्यातील ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola District Guardian Minister Bachchu Kadu will meet the thinkers