अबब! या जिल्ह्याचा मृत्यूदर राज्यापेक्षा जास्त; म्हणून आता सर्वांचे लक्ष...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 June 2020

शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. शनिवारी (ता.२७) एकाच दिवशी ५७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.

अकोला : मागील काही दिवसांपासून अकोल्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याबरोबरच या पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात असून, आतापर्यंत ७३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकाने आत्महत्या केली आहे. एकीकडे राज्याचा मृत्यूदर चार टक्के असताना दुसरीकडे मात्र, अकोल्यातील मृत्यूदर राज्यापेक्षा ५.२० असून, आता राज्याचे लक्ष अकोल्याकडे लागले आहे.

शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. शनिवारी (ता.२७) एकाच दिवशी ५७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यामध्ये आतापर्यंत १४२१ पॉझिटिव्ह अहवाल आले असून, सद्यस्थितीत ३०० रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाला हरवून पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्याही समाधानकारक असली तरी रोज नव्याने वाढत असलेले रुग्ण या सकारात्मकतेला मारक ठरत आहेत. 

तेव्हा येत्या काही दिवसांत अकोला राज्यातील कोरोनाचा नवे हॉटस्पॉट म्हणून उदयास येते की काय अशीही शक्यता यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून शनिवारी एकाच दिवशी ५७ पॉझिटिव्ह अहवाल आले. आतापर्यंत ऐवढ्या मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह अहवाल येण्याचीही ही पहिलीच वेळ असून, रोज वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे अकोलेकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

३०० रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण वयस्क
सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयांतील आयसोलेशन कक्षात सध्या एकूण ३०० रुग्ण कोरोनाशी झुंज देत आहेत. यामध्ये ३०० रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण हे वयस्क असून, तरुणांचे प्रमाण अत्यल्प आहे.

वृद्धांचे प्रमाण अधिक
मृत्यू झालेल्यांमध्ये वयोवृद्धांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. ६० ते ७० वर्ष वयोगटातील नागरिकांचा कोरोनाने बळी घेतला असून, या वृद्धांनी वेळेवर येऊन उपचार घेतले असते तर त्यांचेही प्राण वाचले असते अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola district has a higher mortality rate than the maharashtra state akola marathi news