
अकोला : हरभरा उत्पादकांचे प्रति क्विंटलमागे हजाराेंचे नुकसान
वाडेगाव : शासनाकडून शेतकऱ्यांचे धान्य हमीभावनुसार खरेदी करण्यासाठी नाफेड अंतर्गत खरेदी करण्यात येत असलेले नाफेड खरेदी केंद्र बंद केल्याने शेतकऱ्यांना खरिपाची तयारी करण्यासाठी पैशाची जुळवाजुळव करावी लागत असल्याने नाईलाजाने बाजारपेठेत हरभरा विक्री करावी लागत आहे. नाफेडपेक्षा बाजारपेठेत जवळपास एक हजार रुपयांचा फरक पडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
येथील खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे धान्य नाफेड ऐवजी एफसीआयकडून नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करताना एक नव्हे, तर अनेक जाचक अटी समोर केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. नाफेड अंतर्गत धान्य खरेदी करताना शासनाकडून पोर्टल बंद केल्याने शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांकडे प्रामुख्याने हरभरा बऱ्यापैकी असून, खरीप हंगाम उंबरठ्यावर येऊन ठेपला असल्याने शेती पेरणीकरिता आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी पोर्टल बंद असल्याने शेतकऱ्यांना आपले धान्य बाजारपेठेत विक्रीसाठी न्यावे लागत आहे.
नाफेडकडून हरभऱ्याला प्रति क्विंटल पाच हजार २३० रुपये भाव दिला जात असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. बाजारपेठेत हरभऱ्याला प्रतिक्विंटल तीन हजार ९०० ते चार हजार १५० रुपये भाववारीने रविवारी येथील कृषी उत्पन्न उपबाजारात खरेदी करण्यात आला आहे. पावसाळा उंबरठ्यावर असताना शेती पेरणी नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांनी नाईलाजाने आपला हरभरा बाजारात विक्रीसाठी आणला असताना नाफेड, तसेच बाजारपेठेतील भाववारीच्या तुलनेत बाजारपेठेत हरभऱ्याला प्रतिक्विंटल मागे जवळपास एक हजार ते एक हजार २०० रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे.
रविवारी धान्य बाजारपेठेत ३७५ क्विंटल हरभऱ्याची आवक बाजारात झाल्याची माहिती आहे. बाळापूर खरेदी केंद्रावर एक हजार २०० शेतकऱ्यांकडून नोंदणी करण्यात आली. आतापर्यंत ५२५ शेतकऱ्यांचे धान्याचे मोजमाप करण्यात आले असून, ५०० शेतकरी धान्य मोजमाप होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. एकीकडे शासनाकडून शेतकरी हिताचे ध्येय धोरणात्मक वल्गना करत असताना दुसरीकडे, मात्र शासनाच्या दुटप्पीपणा धोरण असल्याच्या शेतकऱ्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
पोर्टल बंद असल्याने शेतकरी बांधवांना धान्य बाजारपेठेत विक्रीसाठी न्यावे लागत आहे. यामध्ये शेतकरी बांधवांचे मिळणाऱ्या भाववारीत मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
- राजेंद्र घाटोळ, हरभरा उत्पादक, वाडेगाव.
मुळात यंदा खत बियाण्याच्या दरवाढीमुळे चिंता असून, पोर्टल बंद असल्याने शेती पेरणीकरिता खत बियाण्याची व्यवस्था करण्यासाठी नाईलाजाने धान्य बाजारपेठेत विक्रीसाठी न्यावे लागत आहे. भाववारीचा मोठा फटाका सहन करावा लागत आहे.
- सुरेश लोखंडे, शेतकरी
Web Title: Akola Farmer Gram Growers Thousands Loss Per Quintal
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..