अकोला : लसींसाठी मारामार संपली; दोन लाखांवर डोस शिल्लक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Vaccine

अकोला : लसींसाठी मारामार संपली; दोन लाखांवर डोस शिल्लक

अकोला ः कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात लसींचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे लसीकरण मोहीम सुद्धा प्रभावित होत होती. दरम्यान आता शासनाकडून मुबलक प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध होत असल्याना जिल्ह्याची लसींसाठीची मारामार थांबली आहे. सध्या जिल्ह्यात दोन लाख १३ हजार ८० लसींचे डोस शिल्लक आहेत. त्यामध्ये कोव्हीशिल्डच्या १ लाख ७३ हजार ९६० तर कोव्हॅक्सीनच्या ३९ हजार १२० डोसचा समावेश आहे.

१६ जानेवारी २०२१ रोजी देशात कोविड-१९ लसीकरण मोहिमेचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यात तीन ठिकाणी लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली होती. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर १ मार्चपासून शासनाने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या.

सध्या जिल्ह्यातील सर्वच केंद्रांमध्ये ज्येष्ठांचे लसीकरण करण्यात येत होते. त्यासोबतच १ एप्रिलपासून ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांचे सुद्धा लसीकरण करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या जिल्ह्यात ६ लाखांच्या जवळपास असून सदर वयोगटातील लाभार्थी मोठ्‍या संख्येने लस घेत आहे. दरम्यान असे असले तरी लसीकरण मोहिमेच्या सुरुवातीच्या काळात लसीकरणात लस तुटवड्यामुळे नेहमीच खंड पडत होता. दरम्यान आता शासनामार्फत मोठ्‍या प्रमाणात लस उपलब्ध होत असल्याने लसीकरण मोहीम सुरळीत व वेगाने चालत आहे.

मागणी व पुरवठ्यातील अंतर दूर

लसीकरण मोहिमेच्या सुरुवातीच्या काळात लसींच्या डोसची अधिक मागणी जिल्हा आरोग्य विभागामार्फत करण्यात येत होती. दरम्यान आता त्यामधील अंतर कमी झाले आहे. त्यामुळे आता मागणी कमी होत असून पुरवठा वाढल्याचे दिसून येत आहे. त्याचा परिणाम लसीकरणाच्या मोहिमेची गती वाढल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा: संसदेपर्यंत ट्रॅक्टर मार्च निघणारच; अजून मागण्या बाकी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं

जिल्ह्याच्या रॅंकमध्ये सुधारणा

या महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोला जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण फार कमी होते. त्यामुळे जिल्हा ३६ व्या क्रमांकावर पोहचला होता. दरम्यान आता लसीकरणाची गती वाढल्याने जिल्ह्याच्या रॅंकमध्ये सुद्धा सुधारणा होत आहे. सध्या जिल्ह्याची रॅंक ३०व्या क्रमांकावर असून लसीकरणाची हीच गती कायम राहिल्यास जिल्हा २८व्या स्थानी जाईल.

"सध्या जिल्ह्यासाठी मुबलक प्रमाणात लसींचे डोस उपलब्ध आहेत. त्यामुळे लसीकरण मोहिम सुद्धा योग्यरितीने राबविता येत आहे. लसीकरणाचा वेग वाढल्याने जिल्ह्याच्या रॅंकमध्ये सुद्धा सुधारणा होता आहे."

- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा लसीकरण अधिकारी, जि.प., अकोला

loading image
go to top