Akola : शुल्कवसुलीवर प्रशासनाचे मौन

पीक नुकसानीचे सर्व्हेक्षण नि:शुल्क, पैसे उकळलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी
Akola heavy rain farmer crop damage
Akola heavy rain farmer crop damage

वाशीम : या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पीकाचे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांच्या तक्रारीवरुन पीक नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्याचे काम संबंधित विमा कंपनी आणि कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. पीक नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.

नुकसानीचे सर्व्हेक्षण हे वस्तुनिष्ठ करण्यात येत आहे. त्यामुळे पीक नुकसान नसतांना पीक नुकसान झाल्याचे दाखविण्यासाठी शेतकऱ्यांनी कंपनीच्या प्रतिनिधीला पैशाचे आमीष दाखवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. वास्तविक पंधरा दिवसांपूर्वीच विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना कागदपत्राच्या भुर्दंडासोबत प्रत्येकी शंभर रूपये उकळले होते, याची चौकशी न करता विमा कंपनीला प्रशासकीय सुरक्षेचे कवच बहाल केले की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यातील २ लक्ष ७६ हजार ३०३ शेतकऱ्यांनी सन २०२२-२३ च्या खरीप हंगामात २ लक्ष ७ हजार २१३ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला आहे. त्यापैकी ६२ हजार २८३ हेक्टर क्षेत्र पंचनाम्यासाठी पात्र ठरले आहे. यंदाच्या खरीप हंगामात ३ लक्ष ९० हजार २८६ हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त शेतीचे ४९२ सर्व्हेअरच्या माध्यमातून आजपर्यंत ५० हजार ५७७ शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात आल्याची माहिती विमा कंपनीने दिली होती. पंचनामे करण्याच्या काळात विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खासगी इसमांना हाताशी धरून पारावर बसून पंचनामे आटोपले होते.

तसेच गरज नसताना शेतकऱ्यांना सात बारा, आठ अ, बँक पासबुक व आधार कार्डची झेरॉक्स अशा कागदपत्रांची मागणी केली. ही बाब जिल्हा कृषी अधीक्षक व निवासी उपजिल्हाधिकारी यांना कळविली होती. त्यावर उपजिल्हाधिकार्यांनी त्वरित कोणतीही कागदपत्रे लागणार नाहीत, असे आदेश काढले होते. नंतर दुसऱ्या दिवशी विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कागदपत्राची मागणी केली नाही, मात्र शेतकऱ्यांजवळून उकळलेल्या त्या शंभर रूपयाचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सर्व्हेक्षण नि:शुल्क

सन २०२२-२३ या वर्षाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील २ लक्ष ७६ हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना काढला आहे. ८३ हजार ७५० शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत पीक नुकसानीबाबत पुर्व सूचना दिल्या आहेत. प्राप्त पीक नुकसानीच्या तक्रारीच्या अनुषंगाने ५० हजार ५७५ शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार पीक नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्व तालुक्यातून शेतकऱ्यांच्या सूचना प्राप्त अर्जाची संख्या जास्त आहे. काही शेतकरी माझे पीक नुकसानीचे सर्व्हेक्षण आधी करा, असा आग्रह पीक विमा कंपनीच्या सर्व्हेअरकडे करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्राप्त पीक नुकसान सूचना पत्राचे सर्व्हेक्षण विमा कंपनीचे प्रतिनिधी व कृषी विभागामार्फत नि:शुल्क करण्यात येत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना व भुलथापांना बळी न पडता कोणत्याही व्यक्तीस सर्व्हेक्षण शुल्क अथवा कोणत्याही कारणास्तव पैसे देऊ नये. याबाबत कोणीही पैशाची मागणी केल्यास गावचे कृषी सहायक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. आवश्यकता भासल्यास नजिकच्या पोलिस स्टेशनला संबंधिताची तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com