Akola : कपाशीने टाकली मान! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola heavy rains cotton crop damage

Akola : कपाशीने टाकली मान!

अकोला : सततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतांमध्ये पाणी साचून राहल्याने बहुतांश भागात डौलदार कपाशीने मान टाकली असून, पिकाची वाढ खुंटल्याचे तसेच काही भागात बोंड सड झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यावर्षी कापूस उत्पादनाला मोठा फटका बसण्यासोबतच कापसाच्या गुणवत्तेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

गेल्या हंगामात कापसाला सर्वत्र जोरदार व आतापर्यंतचा सर्वोत्तम भाव मिळाल्याने कापूस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला. विविध समस्यांमुळे उत्पादनात घट झाली असली तरी, प्रतिक्विंटल १० ते १३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघाले. पुढील हंगामात देखील असाच भाव मिळेल या अपेक्षेने जिल्ह्यात जवळपास दीड लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी कापूस पिकाची पेरणी केली.

मॉन्सूनच्या सुरुवातीला पावसाची अपेक्षित साथ मिळाली नसली तरी, जुलैमध्ये पावसाच्या जोरदार हजेरीने अकोला, बार्शीटाकळी, अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर तालुक्यांमध्ये पिके डोलायला लागली होती. परंतु, पावसाने सततधार हजेरी लावल्याने व अतिवृष्टी झाल्याने शेतांमध्ये पाणी साचून राहून, आता बहुतांश भागात कपाशीने मान टाकली असून, पिकांची वाढ सुद्धा खुंटली आहे. शिवाय रस शोषण करणाऱ्या कीडी व गुलाबी बोंडअळीचे संकट कायम असल्याने कापूस उत्पादकांची चिंता वाढली असून, तातडीच्या उपययोजनाचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

तातडीची उपाययोजना

झुकलेली झाडे मातीचा भर देऊन सरळ करावीत. शेतातील साचलेले पाणी चर काढून शेताबाहेर काढावे. खोडाभोवती माती दाबून भर द्यावी. कॉपर ऑक्सीक्लोराइड २५ ग्रम + १५० ग्रम युरिया + १०० ग्रम पोटाश १० लिटर पाण्यात घेऊन झाडाच्या बुंध्याशी पंपाच्या सहायाने आंबवणी करावी व झाडालगत साधारण १०० मिली द्रावण पडेल याप्रमाणे बांगडी पद्धतीने देऊन झाडाचे खोड व्यवस्थित दाबून घ्यावे किंवा १ किलो १३:००:४५ + २ ग्रम कोबाल्ट क्लोराईड +२५० ग्रम कॉपर ऑक्सीक्लोराइड २०० लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रती झाड १०० मिली आंबवणी करावी. शेतात वेळोवेळी कोळपण्या कराव्यात.

सर्वत्र कपाशीवर मर

मागील तीन-चार दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस पिकात पाणी साचून कपाशीच्या मुळ्या सडत असून, त्यामुळे प्रामुख्याने मर/आकस्मिक रोगाचा प्रादूर्भाव जिल्ह्यात सर्वत्र झाल्याचे आढळले आहे. दीर्घ पावसाचा खंड व त्यानंतर भरपूर पाऊस आणि जमिनीत अतिरिक्त पाण्याची साठवण व आर्द्रता यामुळे या रोगाची लक्षणे दिसतात.

बोंड सड रोखण्यासाठी व्यवस्थापन

कपाशी पिकाच्या परिपक्व बोंडाची बाह्य बोंड सड लक्षात घेता प्रोपीकोनाझोल २५ टक्के ई.सी. १ मिली किंवा प्रोपीनेब ७० डब्लू.पी. २.५-३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. अंतर्गत बोंड सड रोखण्यासाठी कॉपर ऑक्सीक्लोराइड ५० डब्लू.पी २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

रस शोषण करणाऱ्या किडींचाही हल्ला

कपाशीला अतिवृष्टीसोबतच मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे या रस शोषण करणाऱ्या किडींचाही फटका बसत आहे. त्यामुळे रस शोषक किडींच्या बंदोबस्तासाठी असीटामिप्रीड २० एसपी. १५ ग्रॅम क्रियाशील घटक प्रतिहेक्टर किंवा इमिडाक्लोराप्रिड १७.८ टक्के एस.एल.२ मिली प्रती १० लिटर पाणी किंवा प्रोफेनोफोस ५० टक्के ई.सी.२० मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. लाल्या रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी कपाशीवर १ टक्के मग्नेशिअम सल्फेट + १ टक्के युरियाची फवारणी करावी, असा सल्ला डॉ. पंदेकृवि कापूस संशोधन विभागाचे कृषिविद्यावेत्ता डॉ. संजय काकडे यांनी दिला आहे.

Web Title: Akola Heavy Rains Farmer Crop Damage Cotton Agriculture Loss

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..