
अकाेला : उत्पन्न प्रमाणपत्रासाठी निराधारांना त्रास!
तेल्हारा : शासनाकडून दिव्यांग, विधवा, परित्यक्त्या, महिला व ६५ वर्षांवरील निराधार वृद्ध अशा घटकांना संजय गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी तसेच श्रावण बाळ आदी विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते. विधवा व परित्यक्त्या महिलांना अपत्य १८ वर्षांखालील असल्यास पंधराशे रुपये तर अपत्य १८ वर्षांवरील असल्यास एक हजार रुपये संजय गांधी योजनेंतर्गत मासिक वेतन दिले जाते. त्याचबरोबर ६५ वर्षांवरील वृध्द निराधार महिलांना इंदिरा गांधी योजनेंतर्गत एक हजार प्रती वेतन दरमहा दिले जाते.
याचप्रमाणे ६५ वर्षांवरील वृध्द निराधार पुरुषांना सुध्दा राजीव गांधी योजनेंतर्गत मासिक एक हजार रुपये वृध्दापकाळ वेतन दिले जाते. या सर्व योजना तालुक्याच्या तहसील कार्यालयामार्फत राबविल्या जातात; परंतु या सर्व योजनांचे गेले दोन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. जिल्हा प्रशासनाकडून विधवा व परित्यक्त्या महिलां संदर्भात पुनर्रविवाह किंवा अपत्य १८ वर्षाच्या वर होवून कमावते झाले का? उत्पन्न वाढले का? याविषयी पडताळणी म्हणून पुन्हा सर्व निराधार वेतन सुरू असलेल्या महिला व पुरुषांना नव्याने उत्पन्नाचे प्रमाणपत्र संबंधित तहसील कार्यालयाकडे सादर करण्याचा फतवा काढला आहे. परिणामी सर्व निराधारांना उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.
तलाठी, सेतू केंद्र, तहसील कार्यालयाच्या चकरा मारुण उंबरठे झिजवावे लागत आहे. त्यामुळे निराधारांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत उपाययोजना करून निराधारांची ससेहोलपट थांबवावी. गेले दोन महिन्यांपासूनचे अडकवलेले वेतन ताबडतोब निराधारांच्या बँक खात्यात जमा करावे, अशी मागणी होत आहे.
मी भूमिहीन बेघर असून, माझे वय झाल्याने कुठला कामधंदा करू शकत नाही. मला कोणताही सहारा नाही. शासनाच्या निराधार वृद्धापकाळ योजनेमधून वेतन सुरू आहे. परंतु गेले दोन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
- शंकर तायडे, लाभार्थी, रायखेड
मी दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. त्यामुळे मी कामधंदा करू शकत नाही. मला शासनाच्या अपंग निराधार योजनेचे वेतन सुरू आहे. परंतु गेले दोन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
- पंजाब शिवणकर, लाभार्थी, चांगलवाडी
Web Title: Akola Income Certificate Rajiv Gandhi Yojana Trouble For Senior Citizens
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..