अकोला : संचारबंदीमध्ये वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola : रात्रीच्या 'संचारबंदी'त दोन दिवस वाढ; दिवसाची 'जमावबंदी' उठवली

अकोला : संचारबंदीमध्ये वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः शहरातील कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांनी शहरातील संचारबंदीच्या कालवधीमध्ये दोन दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे आता शहरातील संचारबंदी २३ नोव्हेंबरच्या सकाळी ६ वाजेपर्यंत वाढवण्यात आली असून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत वैद्यकीय कारण वगळता इतर कारणांसाठी बाहेर फिरणाऱ्यांवर मनाई करण्यात आली आहे.

त्रिपूरा येथील घटनेनंतर नजीकच्या अमरावती शहरासह अकोट तालुक्यात तनावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित दोन्ही शहरांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. दरम्यान खबरदारीची उपाययोजना म्हणून अकोला शहरात सुद्धा १७ नोव्हेंबरच्या दुपारी १२ वाजतापासून ते १९ नोव्हेंबरच्या सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू करण्यात आला होता. त्यानंतर पोलिस प्रशासनाने त्यामध्ये वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांना सादर केला होता. त्याअनुषंगाने १९ नोव्हेंबरच्या सकाळी ६ वाजता पासून ते २१ नोव्हेंबरच्या सकाळी ६ वाजेपर्यंत संपूर्ण अकोला शहरासाठी संध्याकाळी ७ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात आला होता.

दरम्यान शहरातील शांतता व सुव्यस्था कायम ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार न घडावा यासाठी शहरातील संचारबंदीमध्ये पुन्हा दोन दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता २१ नोव्हेंबरच्या सकाळी ६ वाजतापसून ते २३ नोव्हेंबरच्या सकाळी ६ वाजेपर्यंत संपूर्ण अकोला शहरासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अंतर्गत रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

संचारबंदी कालावधीमध्ये आरोग्य विषयक सेवा सुरु राहतील, असा उल्लेख उपविभागीय अधिकारी डॉ. अपार यांच्या आदेशात करण्यात आला आहे.

हेही वाचा: संसदेपर्यंत ट्रॅक्टर मार्च निघणारच; अजून मागण्या बाकी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं

काय आहे आदेशात?

  • संचारबंदीच्या कालावधीत कोणत्याही धार्मिक भावना दुखावतील किंवा विभिन्न जाती धर्मांच्या दोन गटांमध्ये तेढ निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य, वक्तव्य करता येणार नाहीत किंवा अफवा पसरविता येणार नाहीत.

  • जातीय भावना भडकावणारे आक्षेपार्ह संदेश समाज माध्यमांद्वारे प्रसारित करता येणार नाहीत, तसेच आक्षेपार्ह पोस्ट टाकणार येणार नाहीत व समाज माध्यमांचा गैरवापर करता येणार नाही.

  • कोणत्याही प्रकारची रॅली, धरणे, मोर्चाचे किंवा कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नाही.

  • प्रचारासंदर्भात काही कार्यक्रम असल्यास या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी यांचे वेगळ्याने परवानगी घेणे बंधनकारक राहील.

  • सदर कालावधीत कोविड १९ लसीकरणाचे सत्र पूर्ण क्षमतेते सुरु राहिल.

  • सदर आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर भादंविच्या १८६० च्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल.

loading image
go to top