
अकाेला : कोल्हापुरी बंधाऱ्याने शेती पाणीदार
मंगरुळपीर : यावर्षीच्या पावसाळ्यात मृद व जलसंधारण विभागाच्या कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये अडवण्यात आलेल्या पाण्यामुळे तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र प्रत्यक्ष ओलिताखाली येणार आहे. तसेच पाझर तलाव आणि गावतलावांत साठलेल्या पाण्यामुळे परिसरातील विहिरींच्या जलस्तरात वाढ होऊन हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी फायदा होणार आहे, अशी माहिती येथील मृद व जलसंधारण विभागाने दिली आहे.
मंगरुळपीर तालुक्यात यावर्षी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे बंधारे आणि तलावांमध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे. मृद व जलसंधारण विभागाने मंगरुळपीर तालुक्यात आतापर्यंत २२ द्वारयुक्त कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. यापैकी सर्वच बंधाऱ्यांत पाणी अडवण्यात आले आहे. यांची सहा हजार हेक्टर सिंचन क्षमता आहे. यापैकी यंदाच्या पावसाळ्यात पाणी साठले असून, शेतकऱ्यांची शेतजमीन प्रत्यक्षात ओलिताखाली येणार आहे.
गाव तलाव व पाझर तलाव, सिमेंट बंधाऱ्यांमधून थेट सिंचनासाठी फायदा होत नाही; मात्र यामुळे परिसरातील विहिरीतील पाणीपातळी वाढून अप्रत्यक्षरीत्या सिंचनासाठी फायदा होत असतो. गावतलाव व पाझर तलावांची सिंचन क्षमता जरी कमी असली तरी कोल्हापुरी बंधाऱ्यातून ६ हजार ५८७ हेक्टर क्षेत्राच्या सिंचनाची सोय होणार आहे. तालुक्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांपैकी सर्वच बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवण्यात आलेले आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील अढाण नदीवर शेलुबाजार, ईचा, नागी, तपोवन, तऱ्हाळा या भागातील द्वारयुक्त कोल्हापुरी बंधारे बांधून पूर्ण झाले असून परिणामी, यंदाच्या पावसाळ्यात इथे तीनशे घनमीटर पाणी साठले आहे. जवळपास सहा हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असून अनेक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे मंगरुळपीर येथील मृद व जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता वाघमारे यांनी सांगितले.
Web Title: Akola Kolhapur Mangrulpeer Twenty Two Dam Water Agriculture
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..