
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या आगीच्या दुर्घटनेची दखल घेत जिल्हाधिकारी अकोला यांनी शहरासह सर्व सरकारी, धर्मदाय संस्था, खासगी रुग्णालय, व दवाखाने, शाळा, महाविद्यालयाच्या, इमारतीमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा आदेश जारी केला आहे.
अकोट (जि.अकोला) : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या आगीच्या दुर्घटनेची दखल घेत जिल्हाधिकारी अकोला यांनी शहरासह सर्व सरकारी, धर्मदाय संस्था, खासगी रुग्णालय, व दवाखाने, शाळा, महाविद्यालयाच्या, इमारतीमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा आदेश जारी केला आहे.
या पार्श्वभूमीवर मा. जिल्हाधिकारी अकोला यांच्या निर्देशानुसार अकोट ग्रामीण रुग्णालयात अग्निशमन विभाग आकोट द्वारे आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाय योजनेची तपासणी करण्यात आली.
अकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहूरवाघ यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन अधिकारी रुपेश विश्वनाथ जोगंदड यांनी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना व कर्मचाऱ्यांना आग विषयी माहिती देऊन आपत्कालीन परिस्थितीचा सामना कशा प्रकारे करावा याविषयी मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.सदर प्रात्यक्षिक करण्यासाठी अग्निशमन विभागाचे प्रकाश आठवले मंगेश दवंडे यांनी सहकार्य केले.
याबाबत बोलताना मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणाले की भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत १० अर्भकांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अशा घटना यापुढे पालिका क्षेत्रात घडणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. अनेक आस्थापना रुग्णालयाची तपासणी करण्यात येत आहे. शिवाय ठिकठिकाणी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रात्यक्षिके घेण्यात येत आहे.
उंच इमारती, शाळा ,महाविद्यालय अत्यावश्यक सेवा जसे रुग्णालये दवाखाने, खासगी क्लासेस व्यावसायिक संकुले यांच्या इमारतीमध्ये आग प्रतिबंधात्मक उपाय तसेच प्रथमोपचार आणि संकटकालीन मार्ग अशा उपाययोजना करून त्याचे वेळोवेळी प्रात्यक्षिक घेणे, महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीव संरक्षण उपायोजना अधिनियम अधिनियम २००७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मध्ये तरतूद आहे. त्यामुळे अग्निशमन विभागाद्वारे संपूर्ण शहरातील दवाखान्याचे फायर ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी रुपेश विश्वनाथ जोगदंड यांनी दिली.
(संपादन - विवेक मेतकर)