
प्लॉट व्यवसायाला अंधश्रद्धेची झालर; घराच्या स्वप्नाला दिशेची खीळ
कारंजा (लाड) : आज मनुष्याने सर्वच क्षेत्रात पाऊल ठेऊन विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर उत्तोरोत्तर प्रगती केली आहे. त्यामुळेच, या आभासी जगताला वैज्ञानिक युग म्हणून संबोधले जाते. तरी, कारंजा शहरात मात्र, आजमितीला सुद्धा भूखंड देवाणघेवाणाच्या व्यवसायात प्लॉट कुठला चांगला याबाबीला शुभ-अशुभाची कीड लागून अंधश्रद्धेसारखा महारोग प्रॉपर्टी विक्रेते यांच्याकडून सर्वसामान्यांमध्ये पसरविल्या जात आहे.
आपल्या टुमदार घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवाय, आयुष्याची संध्याकाळ या घरात सुख-समृद्धीने भरुन जाऊन थोडा आल्हाददायक विसावा याठिकाणी घ्यावा. असे सर्वसामान्य नागरिक मनोमन खून गाठ बांधतात. त्याकरिता, ते आयुष्याच्या कमाईतली पै-पै जमा करुन केलेली पुंजी आपल्या घराच्या स्वप्नात खर्च करण्यासाठी तयार असतात. मात्र, प्रॉपर्टी व्यावसायिक प्लॉट दाखवताना दिशेच्या खेळात गुरफटून टाकतात.
एखादा ले-आउट मधील प्लॉट ग्राहकाला पसंद आल्यास मात्र, त्या प्लॉटमध्ये टक्केवारी कमी असल्यास दलाल, विक्रेते वास्तुशास्त्राचा धिंडोरा पिटून त्याठिकाणी अमुक-अमुक प्राण्यांचा वावर होता. त्यामुळे, याठिकाणी घर बांधल्यास आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते, मुले असुरी, राक्षसी प्रवृत्तीची होतात, तुमचा वंश खुंटू शकतो असे, एक ना अनेक बाबी ग्राहकांच्या मनावर बिंबवून त्यांना नाइलाजास्तव आपल्या संमोहनात ओढतांना दिसून पडतात. तर, ग्राहकाच्या सुद्धा चौरस प्लॉट, पूर्व, उत्तर दिशेचा प्लॉट चांगला, त्रिकोणी, वाकडा-तिकडा प्लॉट आपत्तीजनक असल्याचे शब्द वारंवार कानी पडते.
अखेर, सर्वसामान्य ग्राहक सुद्धा आपले घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विक्रेत्यांच्या मर्जीतील प्लॉट अव्वाच्या-सव्वा भावात खरेदी करतो. आपली फसवणूक झाली असल्याची चर्चा व्यवहार झाल्यानंतर करत असल्याचे दिसून पडत असल्याचे निदर्शनास येते.
शुभ-अशुभाच्या छायेखाली खेळला जाणारा प्लॉटच्या दिशेचा खेळ दिवसेंदिवस भूखंडाच्या किंमती वाढवत आहे. याची दाहकता सर्वसामान्यांच्या घराच्या स्वप्नाला पोहचुन हे स्वप्न दिवा स्वप्न बनले आहे. त्यामुळे, आपले घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ग्राहक वर्ग अंधश्रद्धेचा किनारा घेऊन चांगल्या दिशेचाच प्लॉट खरेदी करत असल्याने हा प्रकार मात्र, विक्रेत्यांना लाभदायक ठरत आहे. यामुळे, सुज्ञ नागरिकांमध्ये याची जोरदार चर्चा रंगत आहे.
भूखंडाला कुंपण करावे
ग्राहकांनी आपल्या नावावर भूखंडाचा सातबाराची नोंद झाल्यानंतर साधारणतः दर ६ महिन्यानंतर तलाठी यांच्याकडून काढून शिवाय, खरेदी, नोंद झाल्यानंतर भूखंडाचा ताबा घेणे महत्त्वाचे आहे. ताबा घेणे म्हणजे प्लॉटला चारही बाजूने कुंपण करुन त्यामध्ये, मालकीबाबतचा बोर्ड तात्काळ लावणे गरजेचे आहे. त्यासोबतच, भूखंड खरेदी करतांना काही शंका आल्यास प्लॉट रिझर्व्हेशन अथवा संपादन याबाबतची माहिती नगर रचना कार्यालयातून घेऊन खातरजमा करावी. तसेच, भूखंडाची सरकारी मोजणी भूमी अभिलेख कार्यालयामार्फत झाली का, याचा तपशीलाचा दाखला घ्यावा. मात्र, ग्राहक विक्रेत्यांवर विश्वास ठेऊन याकडे दुर्लक्ष करतात.
सातबारा ठरतो ग्राहकांसाठी संकटमोचक
खरेदी करीत असलेल्या प्लॉटचे प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच सातबारा याची अथवा सी.टी.एस. उतारा तपासून घेणे शिवाय, सातबारावर गोल वर्तुळात नमूद केलेले फेरफार वाचणे आवश्यक असून या उताऱ्यावरून मिळकतीचा इतिहास कळतो. सोबतच वेळोवेळी झालेली खरेदी, गहाण, बँक अथवा वित्तीय संस्थेचा बोजा असल्याची माहिती मिळते. त्यासह, सातबारामधील कॉलम दोनमधील इतर हक्कांचा, वारसाची नोंद आहे का, याची इतम्भूत माहिती संगणीकृत सातबारा मधून मिळते. त्यामुळे, सातबारा एकप्रकारे संकटमोचकाचे काम करते.
यातून होते अनेकदा फसवणूक
एकच भूखंड एकापेक्षा जास्त व्यक्तींना विकणे म्हणजेच, पलटी व्यवहार, ईसार पावती एकासोबत आणि भूखंड विकणे दुसऱ्याला, भूखंड बँक अथवा वित्तीय संस्था येथील कर्ज काढण्यासाठी गहाण ठेऊन परस्पर भूखंड विकणे तसेच, भूखंड विकताना कुळाची संमती अथवा हक्कसोड न करता तसाच भूखंड विकणे या प्रकाराकडे ग्राहकवर्ग बारकाईने लक्ष देत नसल्याने त्यांची भूखंड विक्रेते, दलाल यांच्याद्वारे फसवणूक होण्याची शक्यता असते.
Web Title: Akola Marathi News Fraud Plot Business Superstition House
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..