अकोला-अकोट रस्त्याचे काम सुरू न केल्याने प्रशासनाचे कठोर पाऊल

Akola Marathi News Strict action of the administration for not starting work on Akola-Akot road
Akola Marathi News Strict action of the administration for not starting work on Akola-Akot road

अकोला : राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला अकोला जिल्ह्यात ‘ब्रेक’ लागला आहे. हा ब्रेक तोडण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाकडून प्रयत्न होत असले तरी कंत्राटदार कंपनीकडून काम करण्यास चालढकल केली जात असल्याने अद्यापही अकोला-अकोट दरम्यानचे रखडलेले काम सुरू होऊ शकले नाही.

त्यामुळे प्रशासनाने कठोर पाऊल उचलत रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वीच नव्याने नियुक्त केलेल्या पुण्याच्या प्रथमेश कन्ट्रक्शन कंपनीला नोटीस पाठवली आहे.


अकोला-अकोट रस्त्याचे काम गेले तीन वर्षांपासून रखडले आहे. प्रथम या रस्त्याचे काम पुण्यातीलच पाटील ॲण्ड कंपनीने घेतले होते. मात्र दोन वर्षांत अपेक्षित काम न केल्याने या कंपनीचा कंत्राट नोव्हेंबर २०२० मध्ये काढून घेण्यात आला. त्यापूर्वी वर्षभर कंपनीने न्यायालयात याचिक दाखल करून खोळंबा टाकला होता. अखेर कंपनीसोबतचा करार रद्द करण्यात आला. मार्च २०२० मध्ये नवीन कंपनी नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानुसार जुन्या कंपनाचा कंत्राट रद्द होताच नवीन कंपनीला कामाचे कंत्राट देण्यात आले.

पुण्याच्याच प्रथमेश कंपनीची निविदा मंजूर झाल्यानंतर नोव्हेंबर २०२० मध्ये कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आला. कार्यरंभ आदेश दिल्यानंतर ३० दिवसांच्या आत कंपनीने काम सुरू करणे अपेक्षित होते. मात्र, आज तीन महिने झाले तरी कंपनीकडून काम सुरू करण्यासाठी कोणतीही यंत्रणा उभारलेली नाही. त्यामुळे मागचे वाईट अनुभव बघता यावेळी महामार्ग प्राधिकरण प्रशासनाने कंपनीला काम सुरू का झाले नाही म्हणून विचारणा केली आहे. सोबतच कंत्राट रद्द का करण्यात येऊ नये म्हणून नोटीसही बजावली आहे. या नोटीसची मुदत मार्च २०२१ पर्यंत आहे. येत्या ६० दिवसांत कंपनीने काम सुरू केले नाही तर कंपनीला फायनल टर्मिनेशन नोटीसही बजावली जाईल.

हेही वाचा - चार अधिकाऱ्यांना पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती !
...............
करारा व्यतिरिक्त पाच कोटी खर्च
अकोला-अकोट रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रखडले असल्याने महामार्ग प्राधिकरणाने कंत्राटदाराला अधिक खोदकाम न करण्याबाबत बजावले होते. मात्र त्यानंतरही पूर्वीच्या कंपनीने रस्त्यावर मोठ्याप्रमाणावर खोदकाम केले होते. त्यामुळे नागरिकांना या रस्त्याने ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा त्रास कमी करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने रस्त्यासाठी मंजूर निधी व्यतिरिक्त अतिरिक्त पाच कोटी रुपये डांबरीकरणासाठी या रस्त्यावर खर्च केल्याची माहिती आहे. सात ते आठ किलोमीटरपर्यंत रस्त्याचे या निधीतून डांबरीकरण करण्यात आले. हा निधी जुन्या कंपनीकडून वसूल करण्यात आला आहे.

हेही वाचा - कोरोनाचा विस्फोट; एकाच रात्रीत अवघे गाव झाले हॉटस्पॉट
....................................
कामासाठी १८ महिन्यांचीच मुदत
अकोला-अकोट रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी नोव्हेंबर २०२० पासून पुढील १८ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यातील पहिल्या तीन महिन्यात कोणतेही काम झाले नाही. त्यातच कंपनीने मूळ अंदाजपत्रकापेक्षा कमी दराची निविदा सादर केली असल्याने कंपनी हे काम सुरू करण्यासाठी चालढकल करीत असल्याची चर्चा आहे.
................
देवरी फाटा येथे उभारणार यंत्रणा
अकोला-अकोट रोडसाठी नवीन कंपनीकडून देवरी फाटा येथे यंत्रणा उभारण्यात येत आहे. मात्र, आवश्यक यंत्रसामुग्री अद्याप येथे पोहोचली नसल्याने काम सुरू करण्यास विलंब होत आहे.
....................
अकोट-अकोला मार्गासाठी नोव्हेंबर २०२० मध्येच कार्यारंभ आदेश दिला आहे. तीन महिने झाली तरी काम न सुरू झाल्याने कंपनीला टर्मिनेशनची नोटीस दिली आहे. मार्च २०२१ पर्यंत कामाला सुरुवात न झाल्यास फायनल नोटीस दिली जाईल. कंपनीकडून येत्या काही दिवसात काम सुरू होण्याची अपेक्षा आहे.
- रावसाहेब झाल्टे, कार्यकारी अभियंता, महामार्ग प्राधिकरण, अकोला विभाग

संपादन - विवेक मेतकर

अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com