Akola : हरभरा खरेदी केंद्रांची प्रतीक्षा; खासगी व्यापाऱ्यांनी पाडले दर Akola market committees Prices lowered by private traders | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola in Market Committees

Akola : हरभरा खरेदी केंद्रांची प्रतीक्षा; खासगी व्यापाऱ्यांनी पाडले दर

अकोला : बाजार समित्यांमध्ये हरभरा, सोयाबीनसह इतर शेत मालाची आवक वाढली आहे. दुसरीकडे नाफेडचे हमीभाव हरभरा केंद्र जिल्ह्यात अद्याप सुरू झाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांसह पर्याय उरला नाही. व्यापाऱ्यांनी दर पाडल्याने शेतकऱ्यांना क्विंटलमागे हजार ते एक हजार २०० रुपयांपर्यंत नुकसान सहन करावे लागत आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या हरभरा खरेदी करण्याकरिता नाफेड यंत्रणे कडून अद्यापही कोणतेही खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना आपला उत्पादित केलेला हरबरा खुल्या बाजारात खाजगी व्यापाऱ्यांना कमी भावात विकणे भागपडत आहे.

शासनाकडून हरभरऱ्यासाठी रुपये पाच हजार ३३० प्रती क्विंटल आधारभूत किंमत निश्चित केलेली आहे. आवक वाढल्याने प्रत्यक्षात आज रोजी शेतकऱ्यांना खुल्या बाजारात चार हजार २०० ते चार हजार ३०० रुपये प्रती क्विंटल हरभरा विकावा लागत आहे. प्रती क्विंटल सरासरी एक हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे शासनाने अत्यंत तातडीने हरबरा खरेदी केंद्रे सुरू करणे गरजेचे आहे.

आठवडाभर प्रतीक्षाच

हरभरा पीक शेतकऱ्यांच्या घरात आले आहे. आर्थिक अडचण असल्याने तो हे पीक फारकाळ घरी ठेवू शकत नाही. त्यामुळे त्याला मिळेल त्या दरात हरभरा विकावा लागतो आहे. ही अडचण लक्षात घेवून आमदार रणधीर सावरकर यांनी सहकार मंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सहकार व पणन सचिव अनुप कुमार यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केली

आणि तातडीने हरभरा खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी लावून धरली. त्यावर केंद्र शासनाकडून याबाबतचे प्रस्तावाला मान्यता मिळाली असून, पुढील आठवड्यात खरेदी केंद्र सुरू करण्याची ग्वाही सहकार मंत्री तसेच पणन विभागाचे प्रधान सचिव यांनी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना हभीभाव केंद्र सुरू होण्यासाठी आणखी आठवडाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पाच एजन्सीची नियुक्ती

हमीभावाने हरभरा खरेदीसाठी नाफेडकडून मार्कफेड, व्हीसीएमसी, व्हीएएपीसीओ, महएफपीसी आणि पृथशक्ती असा एजन्सीची नियुक्ती करण्यात येते. परंतु सदर यंत्रणांकडून सुद्धा कोणतेही खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली नाही.

त्यामुळे आमदार रणधीर सावरकर यांनी मंत्री सहकार व पणन अतुल सावे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि व्यवस्थापकीय संचालक यांना पत्राद्वारे ही बाब लक्षात आणून खरेदी सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतरही शासनाकडून अद्यापपर्यंत हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली नाही.

सोयाबीन,‎ कपाशीची बेभाव विक्री

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत अकोला कृषी उत्पन्न‎ बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक मोठ्या‎ प्रमाणात वाढली आहे. अकोला बाजार समितीमध्ये कमीत‎ कमी चार हजार ५००, जास्तीत जास्त पाच हजार ६१५ तर सरासरी पाच हजार १००‎ रुपये भाव मिळाला.

गेल्या वर्षी‎ कपाशीला १० ते १२ हजार रुपये क्विंटलहून अधिक‎ भाव मिळाला होता. यंदाही त्याच प्रतीक्षेत‎ शेतकऱ्यांनी कापूस राखून ठेवला आहे. मात्र,‎ भाववाढीचे संकेत कमी असल्याने बेभाव सोयाबीन आणि कपाशीची विक्री शेतकऱ्यांना करावी लागत आहे.