मोरगाव भाकरे सतरंजीचे गाव म्हणून नावलौकीक मिळवणार

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 25 June 2020

लहानशा गावात हातमाग उद्योग उभारून गावातील प्रत्येक हाताला काम मिळवून देणाऱ्या मोरगाव भाकरे गावाला सतरंजीचे गाव म्हणून नावलौकीक मिळवून देऊ. त्यासाठी हा उद्योग वाढवून स्थानिकांना रोजगारनिर्मिती व येथिल मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बाल विकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्ष्‍णीक मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण व कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्हा पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले.

अकोला  ः लहानशा गावात हातमाग उद्योग उभारून गावातील प्रत्येक हाताला काम मिळवून देणाऱ्या मोरगाव भाकरे गावाला सतरंजीचे गाव म्हणून नावलौकीक मिळवून देऊ. त्यासाठी हा उद्योग वाढवून स्थानिकांना रोजगारनिर्मिती व येथिल मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बाल विकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्ष्‍णीक मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण व कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्हा पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले.

प्रफुल हॅन्डलूम प्रोजेक्ट व यश कॉटन यार्ड मार्फत उभारलेल्या मोरगाव भाकरे येथील सतरंजी उद्योगाला पालकमंत्री कडू यांनी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अलोक तराणीया, तहसिलदार विजय लोखंडे, सन्मय हॅन्डलूम क्लस्टरचे अरुण जंजाळ यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित उद्यमी व ग्रामस्थांशी संवाद साधतांना ना. कडू म्हणाले की, गावातील लोकांनी शेतीसोबत पुरक व्यवसाय म्हणून छोटे-छोटे कुटीर उद्योग तयार करावे. शासनाने उद्योग पूर्ण गाव तयार करण्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. यातून छोटे-छोटे उद्योग करून गावांनी आत्मनिर्भर व्हावे, असे आवाहन पालकमंत्री ना. कडू यांनी केले. मेहनत, जिद्द व आत्मविश्वास यामुळे उद्योगात यशस्वी होण्यास मदत होते. सर्वांना सोबत घेवून मोरगाव भाकरेला उद्योगपूर्ण गाव म्हणून समोर आणावे यासाठी शासनाकडून जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली. चांगले प्रशिक्षण, मालाची गुणवत्ता व तयार मालाच्या विक्रीचे नियोजन असले तर बँक कर्ज देण्यास तयार असते. तरी योग्य प्रस्ताव सादर केला तर बँकेकडून कर्ज मिळण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Morgaon Bhakre will get fame as the village of Sataranji