Akola : खासदार भावना गवळी यांची तक्रार ; खासदार, आमदारासह नऊ जणांवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकोला ः शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेला उपस्थित आमदार नितीन देशमुख, जिल्हा प्रमुख गोपाल दातकर व इतर पदाधिकारी.

Akola : खासदार भावना गवळी यांची तक्रार ; खासदार, आमदारासह नऊ जणांवर गुन्हा दाखल

अकोला : रेल्वे स्थानकावर खासदार भावना गवळी यांच्या विरोधात शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी घोषणा बाजी करून गद्दार-गद्दार असे नारे दिले होते. यावेळी शिवसेनेचे खासदार व आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी अश्लिल चाळे केले, जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार खासदार भावना गवळी यांनी दिली आहे. त्यानुसार बुधवार रात्री अकोला लोहमार्ग पोलिसांनी विविध कलमांन्वये खासदार विनायक राऊत, आमदार नितीन देशमुख, जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, शहर प्रमुख अतुल पवणीकर यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहे. या संदर्भात आमदार नितीन देशमुख यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेवून ही तक्रार खोटी असल्याचा दावा केला आहे.

खासदार भावना गवळी मंगळवारी अकोला रेल्वे स्थानकावरून रात्री विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईला निघाल्या होत्या. त्याच वेळी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्या स्वागतासाठी आमदार देशमुख व शिवसेनेचे पदाधिकारी रेल्वे स्थानकावर पोहोचले होते. खासदार गवळी यांना बघून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यांना गद्दार म्हणून हिनविले. या सर्व प्रकार रेल्वे स्थानकावर सुरू असताना खासदार राऊत किंवा शिवसेनेचे आमदार व जिल्हा प्रमुखांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एका महिला खासदाराविरुद्ध गैरकृत्य करण्यासाठी प्रेरीत केल्याचा आरोप खासदार गवळी यांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. ही तक्रार पोलिस अधीक्षकांनी लोकमार्ग पोलिसांकडे वर्ग केल्यानंतर संबंधितांविरुद्ध भांदवि कलम १४३, २९४, ५०३ आणि ५०६ नुसार गुन्हे दाखले केलेत.

आमदार म्हणतात, ही तक्रारच खोटी!

आमदार नितीन देशमुख व त्यांच्या सहकार्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरुवारी (ता. २४) शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकार परिषदेत घेतली. त्यात त्यांना भावना गवळी यांनी केलेल्या तक्रारीवर संशय व्यक्त केला. ही तक्रारच खोटी आहे. कुणीही स्वतः तक्रार देताना स्वतःला ताई-दादा लावून घेत नाही. तक्रारीत भावनाताई गवळी असा उल्लेख आहे. यावरून ही तक्रार त्यांनी दिली नसल्याचा दावा आमदार देशमुख यांनी केला. त्यांनी रेल्‍वे स्थानकावर घडलेला प्रकारही पत्रकार परिषदेत कथन केला. गद्दार अशा घोषणा दिल्याची कबुलीही दिली.

मात्र, खासदार गवळी यांनी तक्रारीत केलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले. यापुढेही जेव्हा-जेव्हा खासदार गवळी या अकोल्यात येतील, तेव्हा-तेव्हा शिवसेनेच्या महिला पदाधिकारी त्यांच्या विरुद्ध आंदोलन करून गद्दार अशा घोषणा देतील, असे आमदार देशमुख म्हणाले. या पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, प्रदीप गुरुखुद्दे, देवश्री ठाकरे, जोत्सना चोरे, अतुल पवणीकर, राजेश मिश्रा, मुकेश मुरुमकार, गोपाल भटकर, गजानन चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यांच्यावर झाले गुन्हे दाखल

खासदार भावना गवळी यांच्या तक्रारीवरून खासदार विनायक राऊत, आमदार नितीन देशमुख (टाले), जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे, शहर प्रमुख अतुल पवनीकर, युवासेनेचे राहुल सुरेश कराळे, रामा गावंडे, गजानन बोराळे, प्रदीप गुरुखुद्दे व इतरांविरुद्ध लोकमार्ग पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.

तक्रार विनयभंगाची, गुन्हे दाखल करताना त्याकडे दुर्लक्ष

खासदार भावना गवळी यांनी दिलेल्या तक्रारीत विनयभंग केल्याचा स्पष्ट आरोप आहे. पोलिस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत त्याचा उल्लेख असतानाही लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करताना मात्र, विनयभंगाचा गुन्हा दाखल केला नाही, याबाबात तक्रारकर्त्या गटाकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

काय म्हटले आहे तक्रारीत?

खासदार भावना गवळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अकोला रेल्वे स्थानकावर खासदार विनायक राऊत, आमदार नितीन देशमुख, जिल्हा प्रमुख गोपाल दातकर व इतर जवळपास ५० ते ६० सहकाऱ्यांनी त्यांना बघून गद्दार म्हणून घोषणाबाजी केली. एवढ्यावरच ते थांबले नाही तर अश्लिल चाळे करून, वाईट नजरेने माझेकडे उद्देशून अतिशय खालच्या स्तरातील शिविगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. स्वीय सहाय्यक व अंगरक्षण असल्याने जीव वाचल्याचेही त्या म्हणाल्यात.

जीवघेना हल्ला करण्याच्या उद्देशाने सर्व आले होते. विदर्भ एक्स्प्रेस येईपर्यंत भयंकर त्रास दिला. घानेरडे शब्द उच्चारून भयंकर त्रास दिला. माझा शिलतेचा भंग केला. खासदार राऊत यांना समाजून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी काही न ऐता धमकी दिली व जिवंत कशी राहते, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विदर्भ एक्स्प्रेस आल्यानंतर गाडीत बसल्यावर रेल्वेच्या खिडकीच्या काचावर जोराने बुक्या मारल्या व माझा विनयभंग केला, असा आरोप खासदार भावना गवळी यांनी केला आहे.